Ghanshyam Darode : ही माझी कमाई नाही…छोटा पुढारीने घेतलं नवं घर, शेअर केली खास झलक
Ghanshyam Darode New Home : घनश्याम दरोडेनं स्वबळावर हक्काचं घेतलं असून सोशल मीडियावर नव्या घराची झलक शेअर केली आहे.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झालेला छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो आणि त्याच्याविषयीची अपडेट्स चाहत्यांना देतो. अशातच आता अवघ्या 21 व्या वर्षी घनश्यामनं मोठी झेप घेतली असून स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. घनश्यामनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
घनश्याम दरोडेनं घेतलं हक्काचं घर
घनश्यामनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो घराच्या कागदपत्रांवर सह्या करताना दिसतोय. हा व्हिडिओमध्ये घनश्याम म्हणतोय की, ‘आज काय बोलू ते कळत नाहीये, डोळ्यांत पाणी येतंय. तुमच्या प्रेमापोटी मी आज इथपर्यंत पोहोचलोय.’
आई वडिलांचे मानले आभार
हा व्हिडिओ शेअर घनश्यामनं लिहिलं की, ‘आज २१व्या वर्षी स्वतःच्या हिंमतीवर माझं पहिलं घर बुक केलं. आई-बाबांकडून एक रुपयाही न घेता मिळवलेलं हे घर माझ्या मेहनतीचं यश आहे. पण या यशामागची खरी कहाणी माझ्या कष्टांची नाही, तर आई-बाबांनी माझ्यासाठी आयुष्यभर केलेल्या त्यागाची आहे. माझ्या प्रत्येक गरजेसाठी त्यांनी स्वतःच्या इच्छा मारल्या, माझं भविष्य घडवण्यासाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली, माझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी त्यांनी कित्येकदा स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवलं, आज घराच्या चाव्या माझ्या हातात आहेत. पण या घराच्या प्रत्येक विटेत आई-बाबांच्या त्यागाचा एक तुकडा आहे. आई-बाबा…तुम्ही मला आयुष्यभर घर दिलंत, आज तुमच्या संस्कारांनी मी माझं स्वतः चं घर उभं केलं. ही माझी कमाई नाही, ही तुमच्या त्यागाला दिलेली माझी पहिली छोटीशी परतफेड आहे.’
दरम्यान, घनश्यामच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. घनश्याम दरोडेच्या कामाबद्दल सांगायचं तर त्याला बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे प्रसिद्धी मिळाली. घनश्यामला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र, अनेकदा घनश्यामनं ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिलेलं आहे.