Imran Khan : भारताला बदनाम…इम्रान खानवर कलाकारांचा संताप, देश सोडण्याच्या आदेशाला पाठिंबा

Imran Khan : अभिनेते गजेंद्र चौहान आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी इम्रान खानवर संताप व्यक्त केला असून अभिनेत्यानं लवकरात लवकर देश सोडावा अशी मागणी केली आहे.

Imran Khan : भारताला बदनाम...इम्रान खानवर कलाकारांचा संताप, देश सोडण्याच्या आदेशाला पाठिंबा
| Updated on: Oct 15, 2026 | 8:53 PM

बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याच्या आदेशाला अभिनेते गजेंद्र चौहान यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले की, अशा प्रकरणांमध्ये अधिक कठोर कारवाई केली पाहिजे आणि सरकारनं कठोर कारवाई करून इम्रानला २४ तासांच्या आत देश सोडण्यास सांगावं. सरकारनं अशा व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया जलद करावी, असंहे ते म्हणाले.

 

Loading...

काय म्हणाले गजेंद्र चौहान? 

‘महाभारत’मध्ये युधिष्ठिराची भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी इम्रान खानच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आयएएनएसशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘तपासादरम्यान, परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाला (FRRO) असं आढळून आलं की, इम्रान भारतीय नागरिक नाही. त्यामुळे, आझाद मैदानातील आंदोलनातील त्याचा सहभाग अयोग्य होता. हे कायद्याचं उल्लंघन होतं. सरकारने अशा प्रकरणांमध्ये त्वरित निर्णय घ्यावा.’

‘देशात लपून बसलेल्या देशद्रोह्यांना देश सोडण्यास सांगितलं आहे, याचा मला खूप आनंद आहे. इम्रान खाननं भारतात राहून प्रसिद्धी, पैसा आणि नाव कमावलं. तो अमेरिकेचा नागरिक असूनही, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्डच्या आधारावर येथे राहत होता. इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडायला सांगून सरकारनं खूप चांगली कारवाई केली आहे. माझं म्हणणं आहे की, ही कारवाई अधिक कठोर असावी आणि त्याला २४ तासांच्या आत देश सोडायला सांगावं. सरकारनं अशा लोकांचा लवकरात लवकर शोध घ्यावा.’

तसेच, इम्रान खाननं भारत सोडून जाण्याच्या आदेशावर एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अशोक पंडित यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘मला खरोखर आनंद झाला आहे, कारण तुम्हाला आंदोलन करण्याचा कोणताही अधिकार नाही आणि तुम्ही भारतीय नागरिकसुद्धा नाही, तरीही तुम्ही देशाला बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहात. अभ्यास करा, स्वतःला शिक्षित करा आणि तुमच्या वडीलधाऱ्यांना विचारा की, या देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याची आणि रस्त्यावर उतरण्याची तुम्हाला परवानगी आहे का? तुम्ही भारतात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहात.’

दरम्यान, इम्रान खान हा आमिर खानचा भाचा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांनं १० ऑक्टोबर रोजी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात भाग घेतला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी इम्रान खान यांच्यासह अनेक लोकांना ताब्यात घेतलं. या पोलीस कारवाईनंतर हे प्रकरण चर्चेचा विषय बनलं. या आंदोलनानंतर इम्रान खान यांच्या नागरिकत्वावर आणि भारतातील त्यांच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वृत्तानुसार, इम्रान खान हा अमेरिकन नागरिक असून त्याच्याकडे ओसीआय कार्ड आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us