Jackie Chan : जॅकी चॅन यांच्या मृत्यूची अफवा, सोशल मीडियावर चर्चा; काय घडलं?
Jackie Chan Fake Death News : जॅकी चॅन यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरली होती. मात्र, अभिनेता जिवंत असून ही बातमी खोटी असल्याचं समोर आलं आहे.

चीनचे मार्शल आर्टिस्ट, अभिनेता आणि चित्रपट निर्माता जॅकी चॅन यांच्या मृत्यूच्या बातमीनं भारतातील त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला. मात्र, ही बातमी खोटी आहे. जॅकी चॅन यांच्या मृत्यूच्या खोट्या बातमीनं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. एकाच पोस्टमुळे ही अफवा इतक्या वेगाने पसरली की, अनेक लोकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांमधील चिंता वाढली. मात्र, सत्य काही वेगळंच आहे. जॅकी चॅन जिवंत आणि सुखरूप आहेत, आणि त्यांच्या मृत्यूची बातमी ही केवळ एक अफवा आहे.
एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही.यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरल्या आहेत. आता या प्रकरणात जॅकी चॅन यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.
ही अफवा कशी पसरली?
जॅकी चॅन यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर १९५४-२०२६ असं लिहिलं होतं. हा फोटो पाहून लोकांनी असा अंदाज लावला की, अभिनेत्याचं निधन झालं आहे. अब्दुल नावाच्या युजरने शेअर केलेली ही पोस्ट ८० लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. ही बातमी जगभर वेगाने पसरली.
मात्र, व्हायरल झालेल्या फोटोसोबत आलेल्या एका कम्युनिटी नोटमध्ये ही बातमी खोटी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्या नोटमध्ये म्हटलं आहे की, जॅकी चॅन ७२ वर्षांचे असून जिवंत आहेत. मात्र, त्या नोटकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही. युजर्सनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या.
Jacki Chan had passed the age of 71 now he’s 72, kung-fu legend. ❤️🩹 pic.twitter.com/0WZGhSXl0F
— Abdul (@kayoflagos001) September 28, 2026
जॅकी चॅन यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांनी जुलै २०२६ मध्ये सिंगापूर येथील पेई चुन पब्लिक स्कूलला भेट दिली.
दरम्यान, ७२ वर्षीय जॅकी चॅन हे एक दिग्गज अभिनेते, मार्शल आर्टिस्ट आणि चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी अभिनेत्री ‘द मिथ’ या हिंदी चित्रपटातही काम केलं होतं. हा अभिनेता २०१७ च्या चीन-भारतीय अॅक्शन-अॅडव्हेंचर कॉमेडी ‘कुंग फू योगा’ मध्ये सोनू सूद, दिशा पटानी आणि अमिरा दस्तूर यांच्यासोबत दिसला होता.