Kushal Badrike : लोकांना बोलावून त्यांचा अपमान…अथर्व सुदामेला कुशल बद्रिकेनं चांगलंच सुनावलं, काय घडलं?
Kushal Badrike On Atharva Sudame : कुशल बद्रिकेनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेला सुनावलं आहे.

मराठी अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो आणि त्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करतो. अशातच आता कुशल बद्रिके त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. कुशल बद्रिकेनं पुण्यातील प्रसिद्ध कन्टेन्ट क्रिएटर अथर्व सुदामवेवर संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर अथर्व सुदामेनंही पोह्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कुशल बद्रिकेचा व्हिडिओ चर्चेत
कुशल बद्रिकेचा व्हिडिओ एका खाजगी वृत्तवाहिनीनं शेअर केला आहे. यामध्ये कुशल म्हणतोय की, ‘नमस्कार, हा व्हिडिओ मी करतोय कारण इतक्या वर्षात मला कधी असा वाईट अनुभव आला नाही. पहिल्यांदाच असा एक अनुभव आला की, अथर्व सुदामे हा जो कंटेट क्रिएटर आहे, त्यानं सगळ्या कलाकारांना घरी बोलावलं आणि सांगितलं की, या सुदामेंकडे कांद्यापोह्यांचा कार्यक्रम आहे, आम्ही सगळे गेलो, पण एकालाही त्यानं काही कांदेपोहे दिले नाही…आम्ही सगळे हौशेनं गेलेलो की, चला सुदाम्यांचे कांदेपोहे खाऊयात…पण एकालाही कांदेपोहे मिळाले नाहीत.’
‘तू व्हिडिओवर अपमान करतोस, तिथपर्यंत ठिक आहे, पण बोलावून लोकांचा अपमान करतोयस, हे काही मला पटलेलं नाही, आणि माझा आक्षेप आहे या गोष्टीला अथर्व. बाकी कलाकार त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं रिअॅक्ट करतील, पण मला नाही आवडलंय हे सॉरी…’ असं कुशलनं शेवटी म्हटलं आहे. कुशलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केलेला. मात्र, अभिनेत्यानं ही पोस्ट डिलीट केली आहे.
अथर्व सुदामेची पोस्ट
दरम्यान, अथर्व सुदामेनंही इन्स्टाग्रामवर पोह्यांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता कुशल खरंच अथर्ववर संतापला आहे की, नव्या प्रोजेक्टचा भाग आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
कुशल बद्रिकेच्या कामाबद्दल सांगायचं तर त्याला ‘चला हवा येऊ द्या‘मुळे लोकप्रियता मिळाली. अभिनेता काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मामाच्या गावाला जाऊया‘ या सिनेमात झळकलेला. या सिनेमाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.