Makarand Anaspure : शेवटी ती इच्छा अपूर्णच! नाना पाटेकरांच्या आठवणीत मकरंद अनासपुरे भावुक, म्हणाले, ते गोव्याला जाण्यापूर्वी…

Makarand Anaspure On Nana Patekar : मकरंद अनासपुरे यांनी नाना पाटेकर यांच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच नाना पाटेकर यांची अपूर्ण राहिलेली इच्छाही सांगितली आहे.

Makarand Anaspure : शेवटी ती इच्छा अपूर्णच! नाना पाटेकरांच्या आठवणीत मकरंद अनासपुरे भावुक, म्हणाले, ते गोव्याला जाण्यापूर्वी...
| Updated on: Oct 12, 2026 | 9:44 PM

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची खूप चांगली मैत्री होती. अशातच आता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मकरंद अनासपुरे यांनी नानांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच नाना पाटेकर यांची अपूर्ण राहिलेली इच्छाही सांगितली आहे. मकरंद अनासपुरे म्हणाले की, ‘आठवणींचा कोलाहल माझ्या मनात माझ्या गुरुजींविषयी आहे. नाना हे माझे गुरुजीच. १९९७-९८ मधली गोष्ट असेल. मी मुंबईत संघर्ष करत होतो. त्यावेळी नानांनी मला आधार दिला. ‘वजूद’ सिनेमाचं शूटिंग लोखंडवालामध्ये होतं. मला एका सीनचं नानांमुळेच मिळालेलं छोटंसं काम होतं. मुंबई माझ्यासाठी नवीन होती. लोकेशन माहित नव्हतं. मी पत्ता कुणाला विचारायचा? तर नानांनाच विचारू शकतो. कारण तेच माझ्या ओळखीचे होते. मी त्यांना फोन केला. ते म्हणाले, ‘तुला माझं घर माहिती आहे का? अंधेरीतलं?’ मला ते माहिती नव्हतंच. मग ते म्हणाले, ‘तू कसा येणार आहेस?’ मी म्हणालो, ‘चर्चगेटवरून ट्रेन पकडून अंधेरी स्टेशनला उतरणार.’ त्यांनी सांगितलं, ‘अंधेरी स्टेशनच्या बाहेर तुला या नंबरची बस मिळेल. त्या बसनी तू लोखंडवालामध्ये ये.’ त्यांनी घराचा पत्ता दिला.’

‘मी पोहोचलो. सकाळी पावणे सातची वेळ असेल. मी बेल वाजवली. त्यांनी दार उघडलं. म्हणाले, ‘अरे लवकर आलास.’ मी म्हणालो, ‘हो मला सात वाजता शूटिंग आहे, असं सांगितलं होतं.’ मग ते म्हणाले, ‘तू काही खाल्लंस का?’ तर मी खोटंच ‘हो’ सांगितलं. ‘कुठे खाल्लंस?’ मी म्हणालो, ‘चर्चगेटला.’ ‘किती वाजता निघालास?’ मी म्हणालो, ‘साडेपाचला निघालो एमएलए होस्टेलवरून.’ मग म्हणाले, ‘एवढ्या सकाळी कोणी दुकान उघडं ठेवलं होतं तुझ्यासाठी?’ मग मी सांगितलं, ‘नाही खाल्लं काही.’ मग त्यांनी मला ऑम्लेट बनवून दिलं आणि म्हणाले, ‘आपल्याला भूक असली की सांगायचं, मला भूक आहे. मी खाल्लेलं नाही. त्यात खोटं काय बोलायचं?’ गुरुजींकडून मिळालेल्या अनेक धड्यांपैकी हा एक महत्त्वाचा धडा. गुरुजींची चव काही जणांसाठी आंबट, तिखट, कडवट तर काही जणांसाठी गोड असेल. मी सुदैवानं त्यांची गोड चव कायमच अनुभवत राहिलो.

Loading...

‘काही वर्षांपूर्वी माझी पत्नी शिल्पाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. मी खूप टेन्शनमध्ये आलो. शिल्पानं मला दम दिला की, ‘माझ्या या आजाराविषयी कुणाला काही बोलू नकोस. जर मला कोणी सहानुभूती द्यायला आलं तर मी तुला मारीन.’ पण मी गुरुजींपासून काही लपवत नसल्यामुळे त्यांना सांगितलं. त्यांनी लगेचच डॉक्टर राजेंद्र बडवे यांना फोन केला. त्यानंतर तिच्या सगळ्या केमो आणि सर्जरीमध्ये सुद्धा सातत्याने त्यांनी मला भक्कम पाठिंबा दिला. ती बरी झाली. त्यावेळी मला खूप त्रास होऊ नये याची सर्वतोपरी काळजी गुरुजींनी घेतली.’

नाना पाटेकर यांची इच्छा अपूर्ण

नाना पाटेकर यांनी दुष्काळावर उपाययोजना करायचं ठरवलेलं, याबद्दल बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले की, ‘मी पुण्याला प्रवासात होतो. त्यावेळी तुकाराम मुंढे साहेबांचा फोन आला. ते आमचे खूप जवळचे मित्र. त्यांना खूप धक्का बसला होता. ते म्हणाले, दिवाळीनंतर नाना माझी जाहीर मुलाखत घेणार होते नाशिकला. मी म्हटलं, किती छान झालंं असतं. खूप गोष्टी राहिल्या… कारण ते गोव्याला जाण्यापूर्वी आम्हाला सांगून गेले होते की, दुष्काळ यंदा जास्त दिसतोय. आपण सगळ्यांशी चर्चा करून यातून काय मार्ग काढता येईल, ते बघूया…ते अजूनही माझ्या डोक्यात घुटमळत आहे.’ मकरंद अनासपुरे यांनी ‘लोकमत‘ या वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us