REVIEW : समाजाला आरसा दाखवणारा ‘आर्टिकल 15’

| Updated on: Jun 29, 2019 | 11:08 AM

एका विशिष्ट वर्गाला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी त्यांच्या मुलींवर, बायकांवर सामुहिक अत्याचार केले जातात, त्यांना मारुन झाडावर लटकवून दिलं जांतं. हेच भयावह विदारक वास्तव अनुभव सिन्हा यांनी 'आर्टिकल 15' या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

REVIEW :  समाजाला आरसा दाखवणारा आर्टिकल 15
Follow us on

‘मैं और तुम इन्हे दिखाई ही नही देते, हम कभी हरिजन हो जाते है, तो कभी बहुजन हो जाते है, बस जन नही बन पा रहे कि जन गण मन में हमारी भी गिनती हो जाये.  अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आर्टिकल 15’ या सिनेमातील हा संवाद तुम्हाला गहन विचार करायला भाग पाडेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील अनुच्छेद 15 अर्थात ‘आर्टिकल 15’मध्ये स्पष्ट शब्दात लिहलंय की, कोणत्याही व्यक्ती विरोधात केवळ धर्म, जात, वंश, लिंग या निकषांच्या आधारावर कोणीही भेदभाव करणार नाही. पण समाजात आजही हा भेदभाव सुरु आहे. हे जातीभेदाचं विष समाजात इतकं पेरलं आहे की, काही भागात याचे भयंकर परिणाम बघायला मिळतात.

एका विशिष्ट वर्गाला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी त्यांच्या मुलींवर, बायकांवर सामुहिक अत्याचार केले जातात, त्यांना मारुन झाडावर लटकवून दिलं जांतं. हेच भयावह विदारक वास्तव अनुभव सिन्हा यांनी ‘आर्टिकल 15’ या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातून समाजात जाती, धर्माच्या नावाखाली होणाऱ्या भेदभावाबद्दल गहन संदेश देण्यात आला आहे. अनुभव सिन्हा नेहमीच वेगळ्या धाटणीचे सिनेमे करतात. त्यांचा ‘आर्टिकल 15’ ही त्याच पठडीतला.

कथेला सुरुवात

आईपीएस अधिकारी अयान रंजन (आयुष्मान खुराना)ची पोस्टिंग मध्यप्रदेशमधील लालगांवला होते. यूरोपमधून उच्चशिक्षण घेऊन आलेला अयान या गावात आपली पोस्टिंग झाल्यामुळे प्रचंड उत्साही असतो. पण गावात आल्यावर गावातील भीषण परिस्थिती बघून अयान प्रचंड हादरतो. ज्या गोष्टींची कल्पनाही आपण करु शकत नाही, अशा गोष्टी गावात घडत असल्यामुळे अयान प्रचंड अस्वस्थ होतो. याचदरम्यान गावातील कंपनीत काम करणाऱ्या तीन दलित मुली बेपत्ता झाल्याची माहिती अयानला मिळते, पण त्यांची साधी एफआयआरही दाखल करण्यात आलेली नसते. तीनपैकी दोन मुलींचा मृतदेह दुसऱ्या दिवशी झाडाला लटकवलेला आढळतो. ऑनर किलींगच्या नावाखाली त्यांच्या घरच्यांनीच त्यांना मारुन झाडावर लटकवल्याचं अयानला सांगण्यात येतं. परंतु गावातील दलित मुलगी गौरा (सयानी गुप्ता)च्या मदतीने अयानला काय घडलंय याचा अंदाज येतो. मुलींवर गँग रेप झाल्याचं अयानला कळतं. याला जातिवादाचा बेगडी रंग देऊन लहान मुलींवर अत्याचार करण्यात आलेले असतात. आता अयान आरोपींना गजाआड करायचंच असा चंग बांधतो. या सगळ्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे व्हायला सुरुवात होते. पांढरपेशा समाजातील भयावह चेहरा समोर येऊ लागतो. जातीवादाच्या नावावर पसरलेल्या या दलदलीत राज्याच्या मंत्रीपासून पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचाच समावेश असतो. आता अयान तिसऱ्या मुलीचा शोध घेतो का ? ती जिवंत असते का ? अयान मुख्य आरोपींना पकडण्यात यशस्वी ठरतो का? त्याला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो ? कुठलं भयावह वास्तव त्याच्या समोर येतं ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ‘आर्टिकल 15’ हा सिनेमा बघितल्यावरच मिळतील.

कमर्शियल नव्हे रिअलिस्टीक सिनेमा

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे की, त्यांनी हा गंभीर विषय थ्रिलर अंदाजात मांडला आहे. सिनेमातील एक सीन खरंच अंगावर येतो जेव्हा अयानला कळतं की फक्त तीन रुपये जास्त मागितल्यामुळे मुलींना रेप करुन मारण्यात येतं. चित्रपटात अशी अनेक दृश्य आहेत ज्याने तुमच्या अंगावर काटा येईल. खरंतर हा सिनेमा कमर्शियल दृष्टीकोन नजरेसमोर ठेऊन जर बनवला असता तर कदाचित अजून फुलला असता, पण दिग्दर्शकानं सिनेमा रिअलिस्टीक ठेवण्यावर भर दिला आहे आणि हाच या सिनेमाचा प्लस पाईंट आहे.

दमदार सादरीकरण

इवान मुलिगनच्या सिनेमॅटोग्राफीमध्ये चित्रीत करण्यात आलेली दृश्य तुम्हाला विचलित करतील. मारुन झाडाला लटवलेल्या मुलींचं दृश्य असो किंवा कामगाराचं नाल्यात उतरुन सफाई करण्याचं दृश्य अशी अनेक दृश्य बघून तुम्ही अस्वस्थ व्हाल. चित्रपटातील अगदी छोटी छोटी पात्रही आपल्या लक्षात राहतात. चित्रपटावरुन अनेक वाद झाले. पण वाद व्हावे असं या चित्रपटात खरंच काही नाही. चित्रपटाची गती थोडी संथ आहे, पण सादरीकरण इतकं दमदार आहे की तुम्ही कथेत गुंतत जालं.

एकीकडे आपण भारत महासत्ता बनण्याचं स्वप्न बघतोय आणि दुसरीकडे भारतात आजही अशी काही गावं आहेत, जिथे जातीचं विष पेरलं जातं. या गावांमध्ये माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडतात. कधी याबद्दल उघड वाच्यता केली जाते तर कधी भीतीपोटी मूक गिळून बसावं लागतं. सिनेमा संपल्यावर मन सुन्न होऊन असे असंख्य विचार मनात घोळू लागतात.

धीरगंभीर अयान सगळ्यांसाठी सरप्राईज

नेहमी वेगळ्या आणि हटके भूमिका करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या आयुष्मान खुराणानं या सिनेमातही कमाल केली आहे. खरंतर अशा अंदाजात आयुष्मानला त्याच्या चाहत्यांनी याआधी कधीही बघितलेलं नाही. त्यामुळे आयुष्मानने साकारलेला धीरगंभीर अयान खरचं सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. काही प्रसंगात तर तो फक्त नजरेनेच व्यक्त झाला आहे. अयानच्या गर्लफ्रेंड अदितीच्या भूमिकेतील ईशा तलवारची भूमिका जरी छोटी असली तरी नक्कीच लक्षात राहते.

लक्षात राहणाऱ्या भूमिका

दलित मुलगी गौराच्या भूमिकेत सयानी गुप्तानं कमाल केली आहे. बऱ्याच प्रसंगात तर संवाद नसतानाही सयानी ज्या पध्दतीनं व्यक्त झालीये ते पाहताना अफलातून वाटतं. कुमुद मिश्रा आणि मनोज पाहवा यांनीही उत्तम काम केलं आहे. विशेष म्हणजे दलित नेत्याच्या भूमिकेत जीशान अयूबची भूमिका जरी छोटी असली तरी प्रभावशाली आहे. जीशानच्या तोंडी असे अनेक संवाद आहेत जे तुमच्या मनावर खोलवर परिणाम करतील. सिनेमा संपल्यावरही तुम्ही त्याचा विचार करत राहाल. मंगेश धाकडेचं संगीतही प्रभावशाली आहे.

एकूणच काय तर, रिअलिस्टीक-थ्रिलर प्रकारात मोडणारा हा सिनेमा समाजाला आरसा दाखवण्याचं काम करतो.

टीव्ही 9 मराठीकडून या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स