MOVIE REVIEW : स्वप्नांना नव्यानं बळ देणारा ‘पंगा’

| Updated on: Jan 24, 2020 | 8:46 PM

प्नांना तुम्ही जिद्दीच्या जोरावर केव्हाही गवसणी घालू शकतात, यश मिळवू शकतात. हेच अश्विनी अय्यर-तिवारीनं 'पंगा'मध्ये दाखवलंय. चुल आणि मुल या प्रपंचात ज्या महिला आपल्या स्वप्नांना मुरड घालतात त्या सगळ्यांसाठी 'पंगा' उत्तम उदाहरण आहे.

MOVIE REVIEW : स्वप्नांना नव्यानं बळ देणारा पंगा
Follow us on

मुंबई : ‘मै एक मां हु और मा के कोई सपने नई होते’. अश्विनी अय्यर-तिवारी दिग्दर्शित ‘पंगा’ सिनेमातील हा संवाद घर-संसारात रमल्यामुळे आपल्या स्वप्नांना तिलांजली देणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपलासा वाटेल (Panga Movie Review). संसारात रमल्यामुळे कित्येक स्त्रियांना आपली महत्त्वाकांक्षा, स्वप्न सोडून द्यावी लागतात. पण तुमच्यात जिद्द आणि महत्त्वाकांक्षा असेल, तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वयाच बंधन नसतं. त्या स्वप्नांना तुम्ही जिद्दीच्या जोरावर केव्हाही गवसणी घालू शकतात, यश मिळवू शकतात. हेच अश्विनी अय्यर-तिवारीनं ‘पंगा’मध्ये दाखवलं आहे. चुल आणि मुल या प्रपंचात ज्या महिला आपल्या स्वप्नांना मुरड घालतात त्या सगळ्यांसाठी ‘पंगा’ एक उत्तम उदाहरण आहे. बॉलिवूडमध्य़े आतापर्यंत अनेक स्पोर्ट्स ड्रामा आलेत, पण ‘पंगा’नं त्यापुढे जाऊन विचार केल्यामुळे हा सिनेमा इतरांपेक्षा वेगळा ठरतो (Panga Movie Review).

जया निगम (कंगना रानौत) एकेकाळी कबड्डीच्या टीमची कॅप्टन असते, पण घरातल्या वाढत्या जबाबदाऱ्यामुळे तिला तिच्या स्वप्नांना मुरड घालावी लागते. आपला नवरा प्रशांत (जस्सी गिल) आणि आपला ७ वर्षांचा मुलगा आदि (यज्ञ भसानी)सोबत सुखी आयुष्य जगत असते. रेल्वेत क्लर्क म्हणून काम करत असलेल्या जयाचे नवरा आणि मुलगा एवढचं विश्व असते. एकदिवस अशी काही घटना घडते की जयाचा मुलगा आदि जयानं पुन्हा एकदा कबड्डी टीममध्ये कमबॅक करावं असा आग्रह धरतो. मुलाचा हट्ट पुर्ण करण्यासाठी जया वयाच्या 32 व्या वर्षी पुन्हा एकदा टीममध्ये परतण्याचा चंग बांधते. या सगळ्यात प्रशांत आणि आदि तिला मदत करतातच शिवाय तिची आई (नीना गुप्ता) आणि बेस्ट फ्रेण्ड मीनू (रिचा चढ्ढा) तिला सपोर्ट करतात. आता जया परत नॅशनल टीममध्ये कमबॅक करते का? तिला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला ‘पंगा’ बघाव लागेल.

‘निल बटे सन्नाटा’, ‘बरेली की बर्फी’ सारखे वेगळ्या लीगचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक अश्विनी अय्यर-तिवारीनं या सिनेमात पुन्हा एकदा मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा मांडली आहे. तिने भोपाळ सारख्या शहरात काम करणारी महिला आणि मध्यवर्गीय कुटुंबाचा प्रपंच सगळं उत्तमरित्या दाखवलं आहे. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करण्यात आहे. या चित्रपटाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा अगदी पहिल्या फ्रेमपासूनच पकड घेतो. अश्विनी जया, जयाची आई आणि मीनूच्या पात्रांद्वारे महिला सशक्तीकरणावर भाष्य करते, पण याचा प्रभाव त्या पात्रांवर अजिबात पडू देत नाही, हे या सिनेमाचं यश म्हणावं लागेल. स्त्रियांना त्यांच्या मर्जीप्रमाणे ‘पंगा’ घेऊ द्यायला हवा, हे कुठेतरी सिनेमा बघतांना सातत्यानं जाणवतं राहतं.

‘हर बार औरते से ये क्यु पुछा जाता है की उसे करीअर छोडने के लिए पति या घर ने मजबूर किया, यह उसकी अपनी चॉईस भी तो हो सकती है,’ ‘तुमको देखती हु तो बहुत खुशी होती है, बेटे को देखती हु तो बहोत खुशी होती है मगर खुद को देखकर खुशी नही होती,’ सारखे संवाद विचार करायला भाग पाडतात. याच श्रेय जातं निखिल मल्होत्रा आणि अश्विनीला. सिनेमाचा फर्स्ट हाफ थोडीशी जयाची पार्श्वभूमी सांगण्यात जातो. मध्यंतरानंतर मात्र सिनेमानं चांगली गती पकडली आहे. आता सिनेमात काही त्रुटी आहेत. कबड्डीच्या मॅचेसमधला थोडा फिल्मीपणा टाळता आला असता, बरं संघात कंगनाला ज्या पध्दतीची वागणूक संघाची कर्णधार स्मिता (स्मिता तांबे) देते ते न पटणारं आहे. ही अतिशोयक्ती टाळली असती, तर बरं झालं असतं. या काही लहान त्रुटी सोडल्या तर बाकी सिनेमा सिनेमा झाक झालाय.

कंगनानं सिनेमात कमाल केलीये. जयाच्या छोट्याछोट्या गोष्टी तिनं बारकाईने दाखवल्या आहेत. आपल्या स्वप्नांना मूरड घातल्यावर आतून निराश असलेली पण आपली स्वप्न आपल्या मुलात बघणारी जया तिनं उत्तम साकारली. कंगनानं साकारलेली जया बऱ्याचवेळ प्रेक्षकांच्या लक्षात राहिल. मुलगी, आई, पत्नी, मैत्रिण आणि खेळाडू अशा विविध छटा तिनं उत्तमरीत्या साकारल्या आहेत. पंजाबी स्टार जस्सी गिलं कंगनाच्या नवऱ्याच्या भूमिकेत मन जिंकलं. त्याच्या पात्राच्या तुम्ही नक्कीच प्रेमात पडाल. सिनेमात सगळ्यात जास्त धमाल केली आदिच्या भूमिकेतील यज्ञ भसानी या बालकलाकाराने. त्याच्या प्रत्येक पंचवर तुम्ही पोट धरुन हसाल. अचूक टायमिंग आणि संवाद यामुळे छोटा यज्ञ चांगलाच लक्षात राहिल. नीना गुप्ता आणि रिचा चढ्ढानंही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला. शंकर-एहसान-लॉयनं सिनेमाला दिलेलं संगीत अप्रतिम आहे. विशेषत: ‘जुगनु’ हे गाणं मस्त जमून आलं आहे. जय पटेलची सिनेमॅटोग्राफी कडक आहे. भोपाळ असो किंवा कोलकाता त्याचा कॅमेरा उत्तम फिरला आहे.

एकूणच काय तर ज्या स्त्रियांनी आपल्या स्वप्नांचा गळा घोटला आहे, त्यांना पुन्हा नव्यानं भरारी देणारा, बळ देणारा, स्वप्नांची पूर्तता करणारा ‘पंगा’ हा सिनेमा आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं असा ‘पंगा’ घ्यायलाच हवा..

टीव्ही 9 मराठीकडून या सिनेमाला मी देतोय साडे तीन स्टार्स.