MOVIE REVIEW HIRKANI : आईच्या शौर्याची कथा ‘हिरकणी’

| Updated on: Oct 25, 2019 | 7:38 PM

ज्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी शत्रूंचाही थरकाप उडायचा त्याच गडाची पश्चिम कडा आपल्या तान्हुल्याच्या काळजीपोटी एक आई जीवाची पर्वा न करता उतरली होती. एका आईची ही यशोगाथा लहानपणापसून ऐकतोय आता ती मोठ्या पडद्यावर बघणं खरंच पर्वणी ठरणार आहे

MOVIE REVIEW HIRKANI : आईच्या शौर्याची कथा हिरकणी
Follow us on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारला (Chhatrapati Shivaji Maharaj). 1674 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ह्या किल्ल्याची बांधणी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चांगली होती (Raigad Fort). 2700 फुट उंची असलेल्या ह्या गडावर दरवाज्यांखेरीज कोणताही येण्याजाण्याचा मार्ग नव्हता. ‘रायगडाचे दरवाजे बंद झाले की, खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी’, असं त्याकाळी म्हंटलं जायचं. पण ह्या गोष्टीला अपवाद ठरली ती म्हणजे ‘हिरकणी’ (Hirkani Movie Review).

ज्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी शत्रूंचाही थरकाप उडायचा त्याच गडाची पश्चिम कडा आपल्या तान्हुल्याच्या काळजीपोटी एक आई जीवाची पर्वा न करता उतरली होती. एका आईची ही यशोगाथा लहानपणापसून ऐकतोय आता ती मोठ्या पडद्यावर बघणं खरंच पर्वणी ठरणार आहे. दिग्दर्शक प्रसाद ओक आणि त्याच्या टीमनं हा विषय मोठ्या पडद्यावर आणण्याचं धाडस केलं त्याबद्दल त्यांचं कौतुक. आपण जे वाचलंय ते मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची मज्जाच निराळी. आता जर हिरकणीच्या पराक्रमाचा थरार अजून रंगला असता तर ही मजा अजून रंगली असती.

किल्ले रायगडाच्या खाली काही अंतरावरील गावात बहिर्जी नाईकांच्या ताफ्यातील शूर मावळा जीवा (अमित खेडेकर) त्याची बायको हिरा गवळण अर्थात हिरकणी (सोनाली कुलकर्णी) आणि आईसोबत राहत असतो. त्याची बायको रोज गडावरती दूध विकायला जात असते. एक दिवस कोजागिरीच्या दिवशी हिरा गडावर दूध विकायला गेलेली असते. पण काही कारणास्तव तिला तिथे उशीर होतो आणि सूर्यास्ताच्या आधी ती गडावरुन निघू शकत नाही. नियमाप्रमाणे गडावरील दरवाजे सूर्यास्ताच्या वेळेला बंद होतात, त्यामुळे हिरा अर्थात हिरकणी गडावरच अडकते. आईची माया मात्र तिला स्वस्थ बसू देत नाही. तिचं तान्ह बाळ घरी एकटच असतं. त्यामुळे काहीही करुन आपल्या बाळाजवळ जायचंच या इराद्यानं हिरकणी गडाच्या पश्चिम कडेवरुन खाली जायचा निर्णय घेते. महाराजांना हिरकणीची ही शौर्यगाथा कळताच तिच्या शौर्याचा ते गौरव करतात आणि ती ज्या पश्चिम कडेवरुन खाली उतरलेली असते त्या कडेला ‘हिरकणी बुरुज’ असं नाव देतात. आता हिरकणी गड उतरुन आपल्या बाळापर्यंत कशी पोहोचते हा थरार अनुभवण्यासाठी तुम्हाला ‘हिरकणी’ बघावा लागेल.

‘कच्चा लिंबू’नंतर दिग्दर्शक म्हणून प्रसादकडून अपेक्षा वाढल्या होत्या. त्यातच राजेश मापुस्कर आणि प्रसाद ओक ही राष्ट्रीय पुरस्कार विजेता जोडी या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आल्यामुळे सिनेमा एक वेगळी उंची गाठेल असा तर्कही लावला जात होता. हा अंदाज काही अंशी खऱा ठरला. काहीअंशी यासाठी कारण हा सिनेमा अजून परिणामकारक होऊ शकला असता. असो पण हिंदीत आपण बाजीराव मस्तानी, पद्मावत आणि इतरही तत्सम सिनेमांचा उदोउदो केलायं. आता आपल्या मराठमोळ्या ‘हिरकणी’ची शौर्यगाथाही सगळ्य़ांनी अनुभवयाला हवी. या सिनेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक प्रसाद ओकनं सिनेमात जास्त फापटपसारा न करता थोडक्यात कथानक आटोपतं घेतल्यामुळे चित्रपट अचूक परिणाम साधतो.

मध्यंतरानंतर तर अनेक श्वास रोखून धऱायला लावणारे प्रसंग सिनेमात आहेत. मध्यंतरापूर्वी सिनेमात हिरकणी आणि जीवाची प्रेमकहाणी, महाराजांचा राज्याभिषेक, हिरकणीची महाराजांप्रती असलेली श्रध्दा दाखवण्यात आली आहे. मध्यंतरानंतर हिरकणीचा पराक्रम. सिनेमाची सुरुवात जोरदार भव्यदिव्य होते. सिनेमात घटना फटाफट घडतात त्यामुळे लगेचच आपण त्या कालखंडात हरवून जातो. मध्यंतरानंतर मात्र सिनेमानं थोडा अपेक्षाभंग केला.

हिरकणी गडावरुन उतरतानाचे प्रसंग दाखवतांना तिचा खडतर प्रवास, तिला आलेल्या अनेक अडचणी अजून भडकपणे मांडता आल्या असत्या. पण दिग्दर्शकानं तिचा हा खडतर प्रवास झटकन आटोपता घेतला. ही गोष्ट जरा खटकते. हिरकणी कोण होती, तिची प्रेमकथा यासगळ्यापेक्षा प्रेक्षकांना तिची शौर्यगाथा बघण्यात जास्त रस आहे. 1674 मध्ये तब्बल 2700 फूट खोल कडा कशी उतरली हे जर अजून उत्तम पध्दतीनं मांडलं असतं, तर नक्कीच हिरकणीनं प्रेक्षकांच्या काळजात खोलवर हात घातला असता.

अशा सिनेमांमध्ये स्पेशल इफेक्ट्स हा त्या सिनेमांचा आत्मा असतो. पण या सिनेमातील स्पेशल इफेक्ट्स प्रभावशाली नाही.(हिंदीच्या तुलनेत मराठी चित्रपटांना नेहमीच बजेटचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे याविषय़ी जास्त बोलणार नाही.) हे काहीही असलं तर मराठीत असा कठीण डौलारा उचलल्यामुळे दिग्दर्शक प्रसाद ओकचं विशेष कौतुक.

दिग्दर्शक प्रसाद ओकनं सिनेमावर थोडी अजून मेहनत घेतली असती, थोडे अजून बारकावे दाखवले असते तर हिरकणीला योग्य न्याय मिळाला असता. सोनाली कुलकर्णीनं आपल्या अप्सरा इमेजमधून बाहेर पडून साकारलेली ‘हिरकणी’ अप्रतिम. नवं चॅलेंज स्वीकारल्याबद्दल सोनालीचं विशेष कौतुक. प्रसाद ओकची हिरकणी सोनाली कुलकर्णी असणार हे कळल्यावर सगळ्यांनीच नाकं मुरडली होती. सोनाली हिरकणी शोभणार का? ती हे आवाहन कसं पेलेल? अशा अनेक चर्चा रंगल्या. सोनालीनं मात्र कोणाकडेही लक्ष न देता ही भूमिका पूर्ण ताकदीनं निभावली. सोनालीच्या करिअरमधली ही सर्वोत्तम भूमिका आहे. पण गड उतरण्याचं दृश्य दिग्दर्शकानं जास्त न खुलवल्यामुळे सोनालीच्या विविध छटा यात दिसत नाही. तरीही हिरकणी म्हणून ती लक्षात राहते.

अमित खेडेकरसह सिनेमातील इतर कलाकारांनीही उत्तम काम केलं. 16 व्या शतकातील कालखंड उत्तम उभा केला आहे. संजय मेमाणेंची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. कोजागिरीची रात्र अजून उत्तमरीत्या कॅमेऱ्यात कैद करता आली असती पण  असो. अमितराजचं संगीत उत्तम आहे. विशेषत: शिवराज्याभिषेक गीत आणि ‘जगणं हे न्यारं’ उत्तम जुळून आले. पण आशा भोसलेंनी गायलेली आईची आरती मात्र काळजाला भिडत नाही.

एकूणच काय तर ऐतिहासिक भव्य हिंदी सिनेमांचे आपण नेहमीच गोडवे गातो. आता आपल्या मातीतील एका आईची शौर्यगाथा बघण्याची वेळ आली आहे. सिनेमाच्या टीमनं केलेली मेहनत सिनेमात दिसते. त्यामुळे प्रत्येक आईनं ‘हिरकणी’ची ही धैर्याची, पराक्रमाची कथा मोठ्या पडद्यावर बघायलाच हवी.

‘टीव्ही नाईन मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय तीन स्टार