कर्ज फेडायला करावं लागतं बाबा..; प्राजक्ता माळीच्या पोस्टची चर्चा

| Updated on: Apr 17, 2024 | 4:01 PM

अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्याच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. कर्ज फेडायला करावं लागतं बाबा, असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय.

कर्ज फेडायला करावं लागतं बाबा..; प्राजक्ता माळीच्या पोस्टची चर्चा
Prajakta Mali
Image Credit source: Instagram
Follow us on

मराठमोळी अभिनेत्री आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिने इन्स्टाग्रामवर एखादी पोस्ट टाकताच क्षणार्धात ती व्हायरल होते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. प्राजक्ताने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यावर लिहिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता विविध ब्रँड्सच्या जाहिरातींसाठी फोटोशूट करताना दिसून येत आहे. शूटिंगची पडद्यामागची दृश्ये तिने या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. त्याचसोबत या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘कर्ज फेडायला करावं लागत बाबा’.

प्राजक्ताने कर्जत याठिकाणी फार्महाऊस घेतला होता. यासाठी तिने भलंमोठं कर्ज घेतल्याचंही म्हटलं होतं. फार्महाऊसचे फोटो पोस्ट करत तिने लिहिलं होतं, ‘स्वप्न साकार. माझ्या स्वप्नातल्या फार्महाऊसची मी मालकीण झाली आहे. डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे एवढीच अट होती. अगदी मनासारकं घर मिळालं. खानदानातली सर्वांत सुंदर प्रॉपर्टी, खानदानातल्या सर्वांत मोठ्या कर्जासहीत. फेडू.. फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या.’ त्यामुळे फार्महाऊसचं कर्ज फेडण्यासाठीच प्राजक्ताने असं कॅप्शन दिलं असावं, असं नेटकरी म्हणत आहेत.

हे सुद्धा वाचा

“हे फार्महाऊस घेण्याचं माझं बजेट नव्हतं. पण मी या फार्महाऊसच्या प्रेमात पडले. भलंमोठं कर्ज काढलं. घरातल्या लोकांचे दागिने गहाण ठेवले अन् हे फार्महाऊस घेतलं. पण मला खात्री आहे की हे कर्ज मी फेडेन,” असं प्राजक्ताने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

प्राजक्ताच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘तुमच्यासारखी कर्ज आम्हाला पण होऊदेत आणि तुमच्यासारखं काम पण मिळू दे रे देवा’, असं एकाने लिहिलं. तर ‘टेन्शन नॉट प्राजू. सगळं होईल. कर्ज काय ते तर फिटेलच. तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होवोत असंच देवाकडे मागेन मी’, असं दुसऱ्या चाहत्याने म्हटलंय.

अभिनयासोबतच प्राजक्ता वेगवेगळे प्रयोगही करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिचं कवितांचं पुस्तकसुद्धा प्रकाशित झालं होतं. नंतर तिने मराठमोळ्या दागिन्यांचा ब्रँड काढला. प्राजक्ता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या प्रचाराच्या रणधुमाळीतही उतरली आहे. नुकताच तिने आर्णी याठिकाणी भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी रोड शो केला. त्याचेही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.