Rahul Mahajan : एका वर्षात नियतीचे फिरले फासे, वडिलांचं निधन, घटस्फोट अन्…राहुल महाजननं सांगितला कठीण काळ
Rahul Mahajan : राहुल महाजननं एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे.

रिॲलिटी शो स्टार राहुल महाजननं आपल्या आयुष्यात खूप काही अनुभवलं आहे. पडद्यावर राहुल हसताना दिसत असला तरी खऱ्या आयुष्यात त्याचं आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं आहे. राहुलनं लहान वयातच आपले वडील प्रमोद महाजन, यांना गमावलं. वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच, ड्रग्सच्या ओव्हरडोजच्या एका प्रकरणात त्याला तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं. राहुलचे तीन घटस्फोट झाले आहेत.
राहुलनं तुरुंगातील दिवसांची आठवण सांगितली
सुभोजित घोषच्या पॉडकास्टमध्ये राहुलनं तिहार तुरुंगातील आपल्या दिवसांची आठवण सांगितली. राहुल म्हणाला की, वडिलांना गमावल्यानंतर त्याला वाटलं की, यापेक्षा वाईट काय असू शकतं. पण अवघ्या एका महिन्यानंतर त्याला तिहार तुरुंगात टाकण्यात आलं. त्यानंतर राहुलला जाणवलं की, निसर्गाकडे सर्व शस्त्रे आहेत. तो तुम्हाला एकापेक्षा जास्त वाईट गोष्टी देऊ शकतो. त्या एका वर्षात राहुलच्या आयुष्यात खूप काही घडलं. त्यानं वडील गमावले, लग्न केलं आणि घटस्फोटही घेतला. यानंतर तो तिहार तुरुंगात गेला. हे संपूर्ण प्रकरण ३६५ दिवसांत संपलं. अत्यंत वाईट काळातही त्यानं स्वतःला कधीही इजा केली नाही, किंवा आत्महत्येसारखं पाऊलही उचललं नाही.
राहुल म्हणाला, ‘या सगळ्यांनंतर मला वाटलं, यापेक्षा वाईट काय असू शकतं? मी तिहार तुरुंगात खूप त्रास सहन केला. तिथं पंखा नव्हता, पण मला उष्णता जाणवली नाही. माझं शरीर म्हणत होतं, ‘आता तू काय करू शकतोस?’ दहशतवादी अफझल गुरू तुरुंगात माझ्यापासून १०० मीटर अंतरावर होता. तुम्ही काय करू शकता? आयुष्यात कधीही असं म्हणू नका की, ‘ही माझी सर्वात वाईट अवस्था आहे.’ त्याखाली नरक आहे. माझी अवस्था तशीच झाली होती. मी पूर्णपणे कोलमडून गेलेलो.’ राहुलनं सांगितलं की, तुरुंगात गेल्यानंतरही त्याच्या मित्रांनी त्याची साथ सोडली नाही.
राहुल म्हणाला की, तो आता अध्यात्मात गुंतलेला आहे आणि स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. लोक काय म्हणतात याची त्याला पर्वा नाही. तो स्वतःमध्ये व्यग्र राहतो. कोण काय म्हणतं याची त्याला पर्वा नाही, असंही राहुलनं शेवटी सांगितलं.