‘सनम तेरी कसम’ फेम सरू झाली आई! लग्नाच्या दीड वर्षांनंतर दिला गोंडस मुलाला जन्म, नावंही केल जाहीर
सनम तेरी कसम या चित्रपटातून भारतीय प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी सरस्वती म्हणजेच सरू आता आई झाली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन हिच्या घरी आनंदाची बरसात झाली आहे. नुकताच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची वार्ता तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सनम तेरी कसम या चित्रपटातून भारतीय प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन हिच्या घरी आनंदाची बरसात झाली आहे. मावरा आणि तिचा पती अभिनेता अमीर गिलानी पहिल्यांदाच आई -बाबा झाले आहेत. दोघांनीही इन्स्टाग्रॉम अकाउंटवर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. विशेष म्हणजे दोघांनी आपल्या गोंडस मुलाचं नावही जाहीर केलं आहे.
मावरा आणि अमीर यांनी आपल्या मुलाचं नाव ‘सय्यद अजमार हुसैन कमाल गिलानी’ असं ठेवलं आहे. अमीरने सोशल मीडियावर शेअर करत मुलाला आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट असं म्हटलं आहे. त्याने मुलाचं वर्णन करताना आपल्या कुटुंबाचा अभिमान आणि घराचा छोटा राजा अशा शब्दांत केलं आहे. तर अजमार या नावाने त्याला बोलवणार आहोत ज्याचा अर्थ ‘सिंह’ असल्याचं त्याने सांगितलं.
या पोस्टमध्ये अमीरने रूग्णालयातीलर एक व्हिडिओ शेअर केला आहे.यामध्ये तो आपल्या नवजात बाळाच्या कानात अजान देताना दिसत आहे. ही पोस्ट समोर येताच चाहत्यांनी आणि मनोरंजनविश्वातील कलाकारांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मावरा आणि अमीर यांनी 5 फेब्रुवारी 2025 रोजी लग्न केलं. दोघांची ओळख अनेक वर्षांपासून असून त्यांनी ‘सबात’ आणि ‘नीम’ यांसारख्या पाकिस्तानी मालिकांमध्ये एकत्र काम केलं आहे. या जोडप्याने मावरा गरोदर असल्याची बातमी आधी जाहीर केली नव्हती. त्यामुळे बाळाच्या जन्माची बातमी कळताच चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. मावरा ही ‘सनम तेरी कसम’ या हिंदी चित्रपटामुळे भारतात विशेष लोकप्रिय झाली. या चित्रपटात तिच्यासोबत हर्षवर्धन राणे देखील झळकला होता.