Ashok Saraf : शूटिंगच्या चार दिवसांपूर्वी अशोक मामांना आयसीयूमध्ये ॲडमिट केलेलं…संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला प्रसंग

Sankarshan Karhade On Ashok Saraf : संकर्षण कऱ्हाडेनं एका कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या चपखल विनोदबुद्धीचा किस्सा सांगितला असून एक प्रसंगही सांगितला आहे.

Ashok Saraf : शूटिंगच्या चार दिवसांपूर्वी अशोक मामांना आयसीयूमध्ये ॲडमिट केलेलं...संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला प्रसंग
| Updated on: Oct 24, 2026 | 8:57 AM

अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांचा ‘आदि अनंत‘ या सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमधून अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या गोड नात्याची झलक पाहायला मिळत असून प्रेक्षकांनाही या सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच आता एका कार्यक्रमात संकर्षण कऱ्हाडेनं अशोक सराफ यांचा गंमतीशीर प्रसंग सांगितला आहे. या प्रसंगातून अशोक सराफ यांच्या मिश्किल स्वभावाची प्रचिती येते.

संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा

Loading...

हा किस्सा परभणीतील असून अशोक सराफ एका कार्यक्रमानिमित्त परभणीला आले होते. त्यावेळी संकर्षणच्या आईनं सर्वांना जेवायला बोलावलेलं. संकर्षण, अशोक सराफ, निवेदिता सराफ आणि इतर कलाकरांना घरी जेवायला घेऊन गेला. संकर्षणच्या आईनं खास गुळपोळी केलेली. अशोक सराफही मनसोक्त गुळपोळी खात होते. तेव्हा निवेदिता सराफ यांनी अशोक यांना थांबवत, ‘अशोक, तुला शुगर आहे, जरा कंट्रोल ठेव’, असं म्हटलं. त्यावर अशोक सराफ यांनी क्षणाचाही विलंब न लावता, ‘अगं, मला शुगर आहे, गूळ कुठे आहे?’ असं मिश्कील उत्तर दिलं.

आणखी एक प्रसंग सांगत संकर्षण म्हणाला की, आजही अशोक सराफ ठरलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे आधी सेटवर हजर असतात. आपल्या कामाबद्दलची ही बांधिलकी नव्या पिढीतील कलाकारांसाठी नक्कीच शिकण्यासारखी आहे. विशेष म्हणजे, ‘आदि अनंत’च्या शूटिंगला अवघे चार दिवस बाकी असताना अशोक सराफ यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही ठरलेल्या दिवशी ते शूटिंगसाठी सेटवर हजर झाले. या काळात निवेदिता सराफ यांचीही त्यांना मोलाची साथ लाभली. त्या स्वतः सेटवर येऊन सर्व गोष्टींची पाहणी करून गेल्या आणि दिग्दर्शक महेश लिमये यांना आवश्यक त्या सूचना देऊन गेल्या.

अशोक सराफ यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. विनोदबुद्धी, कामातील शिस्त आणि आपल्या जबाबदारीप्रती असलेली निष्ठा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं असल्याचं संकर्षण म्हणाला.

दरम्यान, ‘आदि अनंत‘ हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us