Sankarshan Karhade : माझ्या आजीने चोराला चहा दिला अन्…संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला प्रसंग
Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेनं नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या आजीचा प्रसंग सांगितला आहे.

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अनेक मुलाखतींमध्ये सामाजिक विषयांवर भाष्य करतो. त्याचे अनुभव शेअर करतो. अभिनेता सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतो. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत संकर्षणने त्याच्या आजीच्या दयाळूपणाचा किस्सा सांगितला आहे. अभिनेत्याच्या आजीनं चोराला चहा पाजलेला, तो प्रसंग संकर्षणने सांगितला आहे.
संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला प्रसंग
मुलाखतीदरम्यान संकर्षण कऱ्हाडे म्हणाला की, ‘माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय. परभणीला विद्यानगर म्हणून एरिया आहे. तिथे माझी आजी राहायची. घर अतिशय छोटं, दोन–तीन खोल्यांचं आणि घराच्या बाजूला पेरूचं झाड, आंब्याचं झाड, चिकूचं झाड, अशा सगळ्या झाडांनी वेढलेलं ते घर. एकेदिवशी रात्री अडीच तीन वाजता, दार खाडखाड वाजलं, आजी एकटीच घरी होती. मागच्या दाराने चोर आलेला तिनं पाहिला. तिनं चोराला म्हटलं, काहीही नाही घरात नेसण्यासारखं. सणासाठी राखून ठेवलेले 1000-2000 रुपये आहेत. त्यातले 500 ठेव, बाकी तू सगळे घेऊन जा. बाकी घरात काहीच नाहीये.’
‘त्यांच्यात मग नॉर्मल बोलणं झालं. आजीनं त्याला विचारलं, आता मग कुठे जातो? चहा घेऊन जा. मग चोराने त्याची सगळी परिस्थिती सांगितली. तो म्हणाला, पाऊसच नाही तर काय करायचं? वर्षानुवर्षे शेती फक्त पाण्यावर आहे, आणि पाऊस नाही. अन्नधान्य मिळवायचं कुठून? पण उपजीविकेसाठी काहीतरी पाहिजे म्हणून तो चोरी करायचा. सकाळी माझ्या आजीने त्याला चहा दिला आणि मग तो गेला. तो काहीही घेऊन गेला नाही. अशा आजी–आजोबांना मी अनुभवलेलं आहे. त्यामुळे माणसं समजून घेणं, हे मला जमलं आहे.’ असं अभिनेत्यानं शेवटी सांगितलं. ‘अभिजात मराठी फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत संकर्षण कऱ्हाडे बोलत होता.
दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेच्या कामाबद्दल सांगायचं तर अभिनेता लवकरच अशोक सराफ यांच्यासोबत ‘आदि अनंत‘ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.