Ujjwal Nikam : अजमल कसाबला बिर्याणी दिलेली का? उज्ज्वल निकम यांनी सांगितलं सत्य

Ujjwal Nikam On Ajmal Kasab : उज्ज्वल निकम यांनी एका मुलाखतीत 26/11 बद्दल आणि अजमल कसाबबद्दल भाष्य केलं आहे.

Ujjwal Nikam : अजमल कसाबला बिर्याणी दिलेली का? उज्ज्वल निकम यांनी सांगितलं सत्य
| Updated on: Sep 30, 2026 | 10:00 PM

‘प्रहार’ सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी, सरकारी वकील आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी २६/११ मुंबई हल्ल्याच्या खटल्याबद्दल भाष्य केलं आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उज्ज्वल निकम म्हणाले की, जिवंत पकडला गेलेल्या एकमेव दहशतवादी अजमल कसाबविरुद्धचा खटला हा कधीही केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नव्हता. उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘प्रहार’ हा सिनेमा न्यायालयीन लढाईवर लक्ष केंद्रित करतो.

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

Loading...

‘प्रहार’ हा चित्रपट उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आणि अजमल कसाबला फाशी देण्यापर्यंत पोहोचलेल्या न्यायालयीन कार्यवाहीवर आधारित आहे. २६/११ हल्ल्यांवर अनेक चित्रपट बनले आहेत, पण उज्ज्वल निकम म्हणाले की, हा चित्रपट वेगळा आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत उज्ज्वल निकम म्हणाले, ‘हा मुळात न्यायालयीन कार्यवाहीवर आधारित चित्रपट आहे.’

निकम यांनी पुढे सांगितलं की, निर्मात्यांनी यासाठी पूर्वतयारी केली होती. चित्रपटासाठी अडीच वर्षांचं संशोधन करण्यात आलं, ज्यामध्ये कथेपासून ते न्यायालयीन कामकाजादरम्यान काय बोललं गेलं याचा समावेश आहे. दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी न्यायालयातील युक्तिवादही ऐकले आणि नंतर उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारणाऱ्या राजकुमार रावसोबत यावर चर्चा केली. निर्मात्यांनी सर्व गोष्टी वास्तववादी ठेवल्या आहेत. उज्ज्वल निकम म्हणाले, ‘वास्तविकता जपण्यासाठी, न्यायाधीशांच्या नावासह खरी नावे वापरली आहेत. हा चित्रपट पूर्णपणे न्यायालयीन कामकाज आणि खटल्यादरम्यान दोन्ही बाजूंच्या युक्तिवादांवर आधारित आहे. यात कोणतीही नाट्यमयता नाही. मी कसा चालतो आणि बोलतो यावरही निर्मात्यांनी संशोधन केलं आहे.’

या चित्रपटातून एक व्यापक संदेश जाईल अशी आशाही उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘दहशतवादी हल्ल्यांना जातीय रंग देऊ नये, असा संदेश या सिनेमाच्या मार्फत दिला जाईल, अशी आशा आहे.’ पुढे, उज्ज्वल निकम म्हणाले की, खटल्याला इतका वेळ का लागला, असा प्रश्न त्यांना अनेकदा विचारला जातो. ‘मुंबई आणि तेथील निष्पाप नागरिकांना टार्गेट करण्यासाठी सीमेपलीकडून एकूण १० दहशतवाद्यांना पाठवण्यात आलेलं. एका अर्थाने, ही पाकिस्तानविरुद्धची कायदेशीर लढाई होती, कारण पुराव्यांच्या आधारे आम्ही एक मोठा कट असल्याचं सिद्ध केलं.’

कसाबबद्दल बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘तो दावा करायचा की तो अल्पवयीन होता किंवा त्याला विष देण्यात आलेलं. त्यानं प्रत्येक गोष्टीसाठी अबू इस्माईलला दोष देऊन १० हल्लेखोरांच्या गटापासून स्वतःला दूर ठेवण्याचाही प्रयत्न केला. त्याचे सर्व खोटे दावे खोडून काढून सत्य समोर आणणं हे आमचं मुख्य काम होतं. एफबीआयच्या प्रयोगशाळेच्या मदतीने माहिती मिळवण्यात आली.’ उज्ज्वल निकम यांनी पोलिसांची प्रशंसा करत म्हटलं की, कसाब आणि पाकिस्तानविरुद्ध खटला उभा करण्यासाठी त्यांनी अहोरात्र काम केलं.

‘कसाबने कधीही बिर्याणीची मागणी केली नाही, किंवा ती त्याला दिलीही गेली नाही. मोठी अडचण ही होती की पीडितांऐवजी लक्ष कसाबवर केंद्रित झालेलं, त्यामुळे आम्हाला ते वातावरण बदलावं लागलं. ‘प्रहार‘ या सिनेमामुळे लोकांना कायदेशीर लढाई आणि २६/११ रोजी भारतावर एका कटाचा भाग म्हणून हल्ला झाला हे सिद्ध करण्यासाठी काय प्रयत्न झाले, हे समजेल. दहशतवाद, पुरावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीडितांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.’

दरम्यान, अविनाश अरुण दिग्दर्शित ‘प्रहार’मध्ये राजकुमार राव आणि वामिका गब्बी, जयदीप अहलावत, सिकंदर खेर, आशिष विद्यार्थी, ललित प्रभाकर आणि ऋत्विक साहोर यांच्या मुख्य भूमिका असून हा चित्रपट 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us