Vandana Gupte: …तर हिच्याशीच लग्न केलं असतं; मीनाताईंसमोर बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली कबुली, वंदना गुप्तेंचा खुलासा
Vandana Gupte On Balasaheb Thackeray : वंदना गुप्ते अनेक मुलाखतींमध्ये ठाकरे कुटुंबाचे किस्से सांगतात. एका मुलाखतीत वंदना यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगितल्या आहेत.

मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांचं ठाकरे कुटुंबासोबत फार जुनं नातं आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी ठाकरे कुटुंबाच्या आठवणी सांगितल्या आहेत. अशातच आता एका मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली आहे. ‘मी सीकेपीसोबत लग्न केल्यामुळे बाळासाहेबांना खूप आनंद झालेला‘ असं वंदना गुप्ते म्हणाल्या.
वंदना गुप्तेंनी सांगितला किस्सा
‘आता राज ठाकरे आणि आम्ही शेजारीच राहतो. मुख्य म्हणजे बाळासाहेबांचं कलाकारांवर खूप प्रेम होतं. माझ्या आईला क्रिकेटची फार आवड होती. एकदा मी आणि आई ब्रेबॉर्न स्टेडियमवर मॅच पाहायला जात होतो. तेवढ्यात बाळासाहेब भेटले आणि त्यांनी आम्हाला विचारलं, कुठे चाललात? ते सुद्धा मॅच पाहायलाच जात होते. आमची स्टेडियममध्ये तिकिटं दुसरीकडे होती. पण, बाळासाहेबांना ‘चला माझ्यासोबत’ असं म्हटलं. मग, त्यानंतर प्रत्येकवेळी जेव्हा बाळासाहेब मॅचला जायचे तेव्हा आम्हाला आवर्जून विचारायचे आणि मग मी आणि आई जायचो.’
‘मग माझं लग्न झालं आणि मी सीकेपीसोबत लग्न केल्यामुळे त्यांना खूप आनंद झालेला. लग्नानंतर मग मी, शिरीष, बाळासाहेब आणि आमच्यासोबत ग्रुपमध्ये आणखी दोघं-तिघं जण होते, आम्ही एक ग्रुप केला होता. आम्ही सगळे मग वर्ल्डकपच्या शेवटच्या ज्या तीन मॅचेस व्हायच्या, त्या एकत्र पाहायचो. कधी बाळासाहेबांच्या घरी, कधी आमच्या घरी, असं प्लॅन करून आम्ही क्रिकेट मॅचेस पाहिल्या आहेत.
‘मला अजूनही आठवतंय, त्यांच्या ‘मार्मिक‘ महोत्सवात पहिल्या वर्षी मी ‘झुंज’ नाटकात काम केलेलं. रस्ते झाडणाऱ्या मुलीची भूमिका होती. मीनाताई आणि बाळासाहेब बसले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी मीना ताईंना विचारलं होतं की, ही चिमुरडी मुलगी कोण आहे? मग ताईंनी त्यांना सांगितलं होतं, आपल्याकडे येते ती माणिकबाईंची मुलगी आहे ही. त्यावर बाळासाहेब मीनाताईंना म्हणाले होते, ‘अगं मला ही आधी भेटली असती तर मी हिच्याशी लग्न केलं असतं.’ मीनाताई मला नेहमी सांगायच्या, ‘अगं ते असं म्हणत होते.”
‘माझ्याकडे बाळासाहेबांचे काही फोटो पण आहेत, अगदी त्यांच्या शेवटच्या दिवसाचे. त्यांना बघायला खूप गर्दी असायची. त्यांनी महाराष्ट्रासाठी खूप केलं.’ असंही वंदना यांनी सांगितलं. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन‘ला दिलेल्या मुलाखतीत वंदना गुप्ते बोलत होत्या.