Raimohan Parida: 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू

| Updated on: Jun 24, 2022 | 5:53 PM

रायमोहन यांनी ओडिया (Odia actor) आणि बंगाली चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. खलनायकी भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जात. त्यांनी करिअरमध्ये जवळपास 100 हून चित्रपटांमध्ये काम केलंय.

Raimohan Parida: 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू
Raimohan Parida
Image Credit source: Twitter
Follow us on

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दु:खद बातमी समोर येत आहे. ओडिया चित्रपटातील दिग्गज अभिनेते रायमोहन परिदा (Raimohan Parida) यांचं निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. भुवनेश्वरमधील (Bhubaneswar) प्राची विहार या निवासस्थानी रायमोहन यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. मात्र त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. रायमोहन यांनी ओडिया (Odia actor) आणि बंगाली चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. खलनायकी भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जात. त्यांनी करिअरमध्ये जवळपास 100 हून चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांच्या अचानक निधनामुळे ओडिया चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायमोहन परिदा यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी भुवनेश्वरमधील प्राची विहार या निवासस्थानी आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृत्यूचं कारण शोधण्यासाठी रायमोहन यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपासही सुरू झाला आहे.

100 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम

पोलिसांच्या चौकशीदरम्यान शेजाऱ्यांनी रायमोहन परिदा यांच्या आत्महत्येची भीती व्यक्त केली आहे. मात्र, तसं असल्यास त्यामागील नेमकं कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. रायमोहन परिदा हे ओडिया चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘सागर’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘बंधना’, ‘असिबू केबे साजी मो रानी’, ‘तू थिले मो दारा कहाकु’, ‘तोह बिना मो कहानी आधा’, ‘छाती चीरिदेले तू’ असे अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्य पुरस्कार विजेते अभिनेते

रायमोहन परिदा यांची लोकप्रियताही अधिक होती कारण त्यांनी चित्रपटांसह ओडिया टेलिव्हिजनवरही बरंच काम केलं आहे. रंगभूमीवरही त्यांचा सहभाग होता. ओडिया व्यतिरिक्त त्यांनी 13 बंगाली चित्रपटांमध्येही काम केलं. रायमोहन परिदा यांना ओडिशा राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यासोबतच त्यांना अभिनंदिया पुरस्कारही मिळाला होता.