एक चिट्ठी सांगेल तुमचा आजार, उपचार आणि औषधं, काय आहे सरकारचा नवा प्लॅन?

| Updated on: Jan 30, 2024 | 4:10 PM

ही चिठ्ठी घेवून दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलात तर त्या डॉक्टरांना तुमची पूर्ण माहिती त्या चिठ्ठीवरूनच समजू शकेल. तुमचा आजार, त्यावर केलेले उपचार, कोण-कोणती औषधं सुरू आहेत, किती दिवसांपासून औषधोपचार सुरू आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टींची अॅलर्जी आहे,

एक चिट्ठी सांगेल तुमचा आजार, उपचार आणि औषधं, काय आहे सरकारचा नवा प्लॅन?
PM NARENDRA MODI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 28 जानेवारी 2024 : तुमच्यापैकी असे अनेक लोक असतील, जे आपल्या उपचारासाठी आयुर्वेद, सिद्ध किंवा युनानी पद्धतीची मदत घेतात. पण, त्याच पद्धतीच्या इतर डॉक्टरांकडे गेल्यावर रुग्णांपुढे अडचणी निर्माण होतात. या वैद्यकीय प्रणालींमध्ये रोग, उपचार आणि औषधांच्या नावांसाठी समान भाषा वापरली जात नाही. प्रत्येक डॉक्टर रोगाचे नाव आणि उपचारांच्या पद्धतीतील बारकावे त्याच्या स्वत:च्या पद्धतीने लिहितो. काही वेळा ते इतर डॉक्टरांना समजणे फार कठीण होऊन जाते. अनेक दशकांपासून त्रस्त करणाऱ्या या समस्येवर आता उपाय सापडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमामधून या संकल्पनेची माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने भारताच्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी औषधांशी संबंधित माहिती आणि शब्दावलीचे वर्गीकरण केले आहे. या कोडिंगच्या मदतीने आता सर्व डॉक्टरांना प्रिस्क्रीप्शन म्हणजेच आपलं औषधं लिहून देण्याच्या चिठ्ठीवर एकसमान भाषेत लिहिणं शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

जर ही चिठ्ठी घेवून दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलात तर त्या डॉक्टरांना तुमची पूर्ण माहिती त्या चिठ्ठीवरूनच समजू शकेल. तुमचा आजार, त्यावर केलेले उपचार, कोण-कोणती औषधं सुरू आहेत, किती दिवसांपासून औषधोपचार सुरू आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टींची अॅलर्जी आहे, अशी सर्व माहिती त्या चिठ्ठीच्या मदतीने दुसऱ्या डॉक्टरला मिळू शकेल असे ते म्हणाले.

जे लोक संशोधनाचे काम करत आहेत, त्या लोकांनाही याचा फायदा होणार आहे. यामुळे इतर देशांतील संशोधकांना आजार, औषधे, त्यांचा प्रभाव यांची सर्विस्तर माहिती मिळू शकेल. संशोधन वाढल्यामुळे अनेक संशोधक यामध्ये जोडले जाणार आहेत. ही औषधोपचार पद्धती आणखी चांगले परिणाम देवू शकेल. अधिकाधिक लोकांचा या उपचार पद्धतीकडे कल झुकेल अशा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

आयुष पद्धतींशी जोडले गेलेले उपचार तज्‍ज्ञ, वैद्य, अभ्यासक या कोडिंग पद्धतीचा लवकरात लवकर स्वीकार करून प्रत्यक्षात वापर सुरू करतील, अशी अपेक्षा व्यक्त करून पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, श्रीमती यानुंग जामोह लैगोकी या अरूणाचल प्रदेशात वास्तव्य करीत आहेत. त्या हर्बल औषधांमध्ये विशेषज्ञ आहेत. त्यांनी आदिवासी, जनजातीच्या पारंपरिक औषधोपचार प्रणालीला पुनर्जीवित करण्यासाठी खूप मोठे कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना यावर्षी पद्म पुरस्कारही दिला गेला आहे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.