ते आता या जगात नाहीत.. कुणाचा क्रिकेट खेळताना तर कोणाचा बसल्या जागीच गेला जीव, 24 तासांत तिघांचा रहस्यमयी मृत्यू..

| Updated on: Feb 26, 2024 | 2:09 PM

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका तरुण क्रिकेटपटूच्या छातीत दुखू लागल्याने त्याचा अचानक मृत्यू झाला. इतकेच नाही तर बामोरीपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या इंदूरच्या कायस्थ खेडी येथे राहणाऱ्या 9वीच्या वर्गातील विद्यार्थिनीला प्रचंड डोकेदुखी होऊ लागली आणि तिचाही मृत्यू झाला.

ते आता या जगात नाहीत.. कुणाचा क्रिकेट खेळताना तर कोणाचा बसल्या जागीच गेला जीव,  24 तासांत तिघांचा रहस्यमयी मृत्यू..
Follow us on

भोपाळ| 26 फेब्रुवारी 2024 : मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका तरुण क्रिकेटपटूच्या छातीत दुखू लागल्याने त्याचा अचानक मृत्यू झाला. इतकेच नाही तर बामोरीपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या इंदूरच्या कायस्थ खेडी येथे राहणाऱ्या 9वीच्या वर्गातील विद्यार्थिनीला प्रचंड डोकेदुखी होऊ लागली आणि तिचाही मृत्यू झाला. तर राजगड जिल्ह्यातही नवोदय शाळेत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीलाही ॲटॅक आला आणि तिचाही जीव वाचू शकला नाही. एकाच दिवसात झालेल्या या ३ धक्कादायक मृत्यूंमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सायलेंट हार्ट ॲटॅक हे तिघांच्याही मृत्यूचे कारण असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. मात्र, मृत्यूचे खरे कारण कळण्यासाठी मृतांच्या व्हिसेरा नमुन्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

क्रिकेट मॅचमध्ये बॅटिंगची वाट पहात असतानाच तो कोसळला

गुना जिल्ह्यातील बामोरी येथे एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान दीपक हा खेळाडू मैदानाबाहेर बॅटिंगची वाट पाहत बसला होता. मात्र अचानक दीपकच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि तो कोसळला. मित्रांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत दीपकचा मृत्यू झाला होता.डॉक्टरांनी सांगितले की दीपकला हृदयविकाराचा झटका आला होता आणि सगळं संपलं. तो अवघअया ३० वर्षांचा तरूण होता. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्याचं लग्नही झालं होतं. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेला दीपक चांगला क्रिकेटपटू होता. तो पूर्णपणे फिट होता, असं त्याच्या मित्रांनी सांगितलं. क्रिकेट टूर्नामेंट खेळण्यासाठी तो फतेहगडला आला पण तिथेच त्याच्या आयुष्याचा खेळ संपला. तरण्याताठ्या मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या घरावर, कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

17 वर्षीय विद्यार्थिनीचा तडकाफडकी मृत्यू

मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालय कचनारिया येथे 12 वीत शिकणाऱ्या मुलीचाही अचानक मृत्यू झाला. ती फक्त 17 वर्षांची होती. रिंकू तिच्या इतर मैत्रिणींसोबत बसून कॉर्न्स खात होती, पण अचानक खाली कोसळली. तिच्या मैत्रीणींनी शिक्षकांना कळवलं. रिंकूला तातडीने खुजनेर रुग्णालयात आणलं पण तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सर्व मुली आपापल्या घरच्यांना भेटत होत्या. त्याचवेळी, रिंकूने दुसऱ्या मैत्रीणीच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या मोबाईलवरून घरी तिच्या मोठ्या बहिणीला फोन केला, गप्पा मारल्या. त्यानंतर थोड्याच वेळात ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे तिच्या मैत्रीणीच नव्हे तर शाळा प्रशासनही हादरलं आहे. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

अचानक तीव्र डोकेदुखी आणि मृत्यू

तिसरी घटनाही अशीच हादरवणारी आहे. इंदूरच्या बाणगंगा परिसरात राहणाऱ्या हेमलता हिचाही मृत्यू झाला. ती तर खूप लहान होती, नवव्या इयत्तेत शिकत होती. घटनेच्या दिवशी तिला तीव्र डोकेदुखी होऊ लागली. घरच्यांनी तिला तातडीने एमवाय हॉस्पिटलमध्ये नेले. पण तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. तिच्या अकस्मात मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. अवघ्या २४ तासांत सायलेंट हार्ट ॲटॅकच्या या तीन घटनांमुळे सर्वच हादरले.