Health : हिवाळ्यात फुफ्फुसांचं आरोग्य जपण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात, जाणून घ्या

| Updated on: Dec 14, 2023 | 3:53 PM

थंडीच्या त्रासापासून श्वसन यंत्रणेचे संरक्षण करण्यासाठी शरीर उबदार ठेवणे महत्वाचे आहे. थंड हवेमुळे वायुमार्गाचे त्रास होऊन श्वसन संक्रमण होण्याची शक्यता वाढते. एकावर एक कपडे घालणे, तोंड आणि नाक झाकण्यासाठी स्कार्फ वापरणे आणि घर पुरेसे उबदार राहील याची काळजी घेणे हे थंडी पासून स्वतःचे संरक्षण करण्याचे प्रभावी मार्ग आहेत.

Health : हिवाळ्यात फुफ्फुसांचं आरोग्य जपण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात, जाणून घ्या
Follow us on

मुंबई : हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि या हंगामामध्ये सगळ्यात मोठी चिंता न्यूमोनियची असते. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसातील पेशींना सूज येते ज्याचा फुफ्फुसातील हवेच्या पिशव्यांवर परिणाम होऊन खोकला, श्वास घेण्यास त्रास, छाती दुखणे अशी लक्षणे दिसतात. हिवाळ्यातील थंड हवामान, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि श्वसन संबधित विषाणूंचा वाढता संपर्क यामुळे न्यूमोनियाचा धोका वाढतो. आपल्या फुफ्फुसांचे रक्षण करण्यासाठी आणि न्यूमोनियाचा धोका कमी कोणत्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे जाणून घ्या. याबाबत न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी मार्गदर्शन केलं आहे.

फुफ्फुसीय कार्य चाचणीमध्ये फुफ्फुसांची क्षमता आणि हवेच्या प्रवाहाची तपासणी केली जाते, हवेतील थंडपणामुळे श्वसन समस्या होण्याची शक्यता वाढलेली असते त्या आहेत का याचा शोध ही चाचणी घेते. छातीचा एक्स – रे, यामध्ये कुठले संक्रमण किंवा इतर काही त्रास आहेत का हे समजते. श्वसन विषयक समस्या असलेल्या लोकांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते, इन्फ्लूएन्झा टाळण्यासाठी फ्लू शॉट महत्त्वाचा आहे. हिवाळ्यात अशा चाचण्या करून घेण्यास प्राधान्य दिल्याने श्वसन यंत्रणेचे संरक्षण करण्यास मदत होते आणि निरोगिपणे ऋतु बदलाच्या त्रासांचा सामना करता येतो.

श्वसन संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठीं स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्वाचे असते न्युमोनियाचे विषाणू आणि बॅक्टेरियांना दूर ठेवण्यासाठी साबणाच्या पाण्याने वारंवार हात धुवा किंवा हॅन्ड सॅनिटायझर वापरा. आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा, विशेषतः आपले नाक आणि तोंड, कारण यामुळे तुमच्या श्वसन प्रणालीमध्ये रोगजनकांचा प्रवेश होऊ शकतो रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे हा न्यूमोनिया प्रतिबंधाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी समृद्ध संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पुरेसे हायड्रेशन देखील महत्त्वपूर्ण आहे, कारण त्यामुळे श्वसनमार्ग ओलसर राहतो शेंबूड आणि इतर घाण काढून टाकणे सुलभ होऊन संसर्गाचा धोका कमी होतो. न्युमोनिया लसीकरण हा एक चांगला उपाय आहे ज्यामुळे त्रास वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. न्यूमोनिया होण्यास कारण असलेल्या विषाणू आणि जिवाणू पासून संरक्षण देणाऱ्या अनेक लसी आहेत. तुमच्यासाठी योग्य लसीकरण वेळापत्रक ठरविण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. हिवाळ्या मध्ये श्वसनमार्गाशी संबंधित विषाणूंपासून बचाव करणे खूप महत्वाचे आहे.

गर्दीच्या ठिकाणी संक्रमणाचा प्रसार जास्त होतो, म्हणून जेव्हा शक्य असेल तेव्हा सामाजिक अंतराचे पालन करा. याव्यतिरिक्त, तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी आजारी असल्यास, रोगजनकांच्या प्रसारास मर्यादित करण्यासाठी मास्क घालणे आणि श्वसन शिष्टाचार पाळणे यासारख्या गोष्टी करा. हिवाळ्यात आपल्या फुफ्फुसांचे न्यूमोनियापासून संरक्षण करण्यासाठी आरोगयपूर्ण जीवनशैली, स्वच्छता पद्धती आणि सक्रिय आरोग्यसेवा उपाय करणे आवश्यक आहे.