Navi Pillay Nobel Peace Prize 2026 : भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार; आजोबा मजूर म्हणून दक्षिण आफ्रिकेत, नातीने जगभरात कमावलं नाव

मजूरांच्या पार्श्वभूमीतून आलेल्या नवी पिल्लई यांनी न्याय आणि मानवाधिकारांसाठी दीर्घकाळ काम केले. त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे आणि नोबेल पुरस्कारामागील कारण जाणून घ्या.

Navi Pillay Nobel Peace Prize 2026 : भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार; आजोबा मजूर म्हणून दक्षिण आफ्रिकेत, नातीने जगभरात कमावलं नाव
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 10:41 PM

ज्या कुटुंबातील आजोबा भारतातून दक्षिण आफ्रिकेत मजूर म्हणून गेले, त्याच कुटुंबातील नवी पिल्लई यांनी जगभरात स्वत:ची ओळख निर्माण केली. भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या पिल्लई यांचा प्रवास गरिबी, वर्णभेद आणि अनेक अडचणींशी झुंज देत आंतराराष्ट्रीय न्यायव्यवस्थेतील महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचण्याचा आहे.

आजोबा भारतातून दक्षिण आफ्रिकेत मजूर म्हणून गेले

नवी पिल्लई यांच्या कुटुंबाची मुळे भारताशी जोडलेली आहेत. त्यांचे आजी – आजोबा 1890 च्या दशकात भारतातून दक्षिण आफ्रिकेतील नाताल भागात गेले होते. ब्रिटिश राजवटीच्या काळात त्यांना ऊसाच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी करारबद्ध मजूर म्हणून नेण्यात आले होते. त्या काळात भारातातून अनेक मजूरांना रोजगाराच्या आश्वासनावर परदेशात नेले जात असे. मात्र त्यांना तिथे अनेकदा कठिण परिस्थितीत काम करावे लागे.

Loading...

अशा संघर्षमय पार्श्वभूमीतून आलेल्या कुटुंबात नवी पिल्लई यांचा जन्म 1941 मध्ये आफ्रिकेतील डरबन येथे झाला. त्यांचे वडील बसचालक होते.तर आई गृहिणी होती. घरची परिस्थिती साधी असली, तरी शिक्षणाच्या जोरावर पुढे जाण्याची जिद्द पिल्लई यांनी सोडली नाही.

वर्णभेदाच्या काळात कायद्याचं शिक्षणं

दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाची व्यवस्था असताना कृष्णवर्णीय लोकांना अनेक प्रकारच्या भेदभावाला सामोरे जावे लागत होते. अशा वातावरणात नवी पिल्ल्ई यांनी कायद्याचं शिक्षण घेतल. पुढे त्यांनी स्वत:ची कायदेविषयक फर्म सूरू केली. वर्णभेदविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत केली.

1995 मध्ये त्या दक्षिण आफ्रिकेत उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या. त्यानंतर त्यांचा प्रवास आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेकडे वळला.

संयुक्त राष्ट्रांमध्ये महत्त्वाची जबाबदारी

नवी पिल्लई यांनी रवांडा येथील नरसंहाराशी संबंधित आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणात न्यायाधीश म्हणून काम केलं. पुढे त्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयातही न्यायाधीश होत्या. 2008 ते 2014 या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली.

युद्धगुन्हे, मानवतेविरूद्धचे गुन्हे आणि नरसंहार यांसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच आंतरराष्ट्रीय कायदा आणि न्यायव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला.

भारताशी मुळं जोडलेल्या एका कुटुंबातील मुलीने दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाच्या काळातून पुढे येत आंतरराष्ट्रिय स्तरावर स्थान मिळवलं. नवी पिल्लई यांचा प्रवास भारतीय वंशाचा वारसा आणि न्यायासाठीचा संघर्ष सांगड घालणार आहे .

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us