मध्य-पूर्वेत खळबळ! सौदी अरेबियावर हूतींचा मोठा हल्ला, थेट शस्त्रांनी भरलेले ट्रक उडवला

Saudi Arabia Houthi Attack : हूती बंडखोरांनी सौदी अरेबिया-येमेन सीमेवरील अल-वदिया परिसरात सौदी अरेबियाशी संबंधित शस्त्रांनी भरलेल्या ट्रकवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे.

मध्य-पूर्वेत खळबळ! सौदी अरेबियावर हूतींचा मोठा हल्ला, थेट शस्त्रांनी भरलेले ट्रक उडवला
saudi arabia houthi attack
Image Credit source: X
| Updated on: Sep 08, 2026 | 10:34 PM

मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर आली आहे. इराण समर्थित येमेनमधील हूती बंडखोरांनी सौदी अरेबिया-येमेन सीमेवरील अल-वदिया परिसरात सौदी अरेबियाशी संबंधित शस्त्रांनी भरलेल्या ट्रकवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. हूती माध्यमांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये क्षेपणास्त्र ट्रकवर आदळताना, त्यानंतर झालेला भीषण स्फोट झाल्याचे दिसत आहे. हूतींच्या म्हणण्यानुसार, ही क्षेपणास्त्रे स्थानिक पातळीवर तयार करण्यात आली होती आणि अल-वदिया छावणीकडे येणाऱ्या शस्त्रांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. मात्र, या दाव्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

येमेनच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अल-वदिया छावणीतील सौदी तळ आणि सैनिकांवर नजर ठेवल्यानंतर मोठ्या संख्येने दारुगोळा आणि शस्त्रांनी भरलेली वाहने आढळून आली. त्यानंतर या ताफ्यावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. जारी करण्यात आलेल्या फुटेजमध्ये क्षेपणास्त्र ट्रकवर आदळल्यानंतर सलग स्फोट होताना आणि आकाशात धुराचे लोट उठताना दिसत आहेत. स्फोटांदरम्यान काही सैनिक छावणीतून पळताना दिसत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. दरम्यान, जुलैमध्ये जवळपास चार वर्षांपासून सुरू असलेला अनौपचारिक युद्धविराम संपल्यानंतर सौदी अरेबिया आणि हूतींमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे.

सौदी अरेबियाकडून पलटवाराचा इशारा

हूतींकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनंतर सौदी अरेबियाने मंगळवारी पलटवार करण्याचा इशारा दिला आहे. सौदी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रात्री झालेल्या हल्ल्यांमध्ये तेल प्रकल्पांमध्ये आग लागली, अनेक ठिकाणचे काम काही काळासाठी ठप्प झाले आणि 73 जण जखमी झाले. सौदीच्या ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, देशाच्या दक्षिणेकडील काही ऊर्जा प्रकल्पांना या हल्ल्यांचा फटका बसला. सौदी नेतृत्वाखालील आघाडीने अबहा, जिझान, नजरान आणि खमीस मुशैत या भागांना लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटले आहे.

येमेनमधील संघर्ष तीव्र होत असतानाच ही घटना घडली आहे. सौदी समर्थित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारने हूतींच्या ताब्यातील भाग पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत. दुसरीकडे, हूतींनी सौदी अरेबियावर हवाई हल्ले केल्याचा आरोप केला आहे. एका तुरुंगावर झालेल्या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाल्याचाही दावा हूतींकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, आता सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. तसेच हूतींकडून होणारे हल्ले आणि लाल समुद्रातील जहाजांवरील हल्ले तातडीने थांबवण्याची मागणीही सौदी अरेबियाने केली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us