वाहनाच्या नंबर प्लेटचे रंग वेगवेगळे का असतात? पांढरी, पिवळी, हिरवी आणि निळी प्लेट काय सांगते?
रस्त्यावर दिसणाऱ्या नंबर प्लेटचे वेगवेगळे रंग फक्त आकर्षक दिसण्यासाठी नसतात. पांढरी, पिवळी, हिरवी, लाल आणि निळी प्लेट कोणत्या वाहनासाठी वापरली जाते, जाणून घ्या.

रस्त्यावरून जाताना कार, बाईक, ट्रक किंवा बसच्या नंबर प्लेटचे वेगवेगळे रंग तुम्ही अनेकदा पाहिले असतील. कुठे पांढरी नंबर प्लेट, कुठे पिवळी तर काही वाहनांवर हिरवी किंवा निळ्या रंगाचीही प्लेट दिसते. पण तुम्हाला माहित आहे का हे रंग फक्त वेगळं छान दिसण्यासाठीच नसतात तर त्यामागे काही महत्त्वाची कारणे देखील असतात. त्यामुळे पुढच्या वेळी रस्त्यावर एखादं वाहन दिसलं तर त्याची नंबर प्लेट पाहून ते वाहन खासगी आहे, व्यावसायिक याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो.
पांढरी नंबर प्लेट म्हणजे खासगी वाहन
भारतात सर्वात जास्त दिसणारी नंबर प्लेट म्हणजे पांढऱ्या रंगाची प्लेट. पांढऱ्या रंग आणि त्यावर काळ्या अक्षरात आकडे किंवा अक्षरे असतात. कार, बाईक, स्कूटर आणि इतर खासगी वाहनांवर ही नंबर प्लेट वापरली जाते. याचा अर्थ वाहन वैयक्तिक वापरासाठी आहे.
पिवळी नंबर प्लेट दिसली तर वाहन कमर्शियल
पिवळ्या रंगाची नंबर प्लेट प्रामुख्याने व्यावसायिक वाहनांसाठी असते.टॅक्सी, कॅब, ऑटो, बस आणि सामान वाहून नेणाऱ्या अनेक वाहनांवर पिवळी प्लेट दिसते. या प्लेटवर काळ्या रंगात रजिस्ट्रेशन नंबर लिहिलेला असतो. म्हणजेच हे वाहन व्यावसायिक वापरासाठी असते.
हिरवी नंबर प्लेट
हिरव्या रंगांची नंबर प्लेट इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरली जाते. खासगी इलेक्ट्रिक कार किंवा बाइकवर हिरव्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगातील अक्षरे आणि नंबर असतात. इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांसाठीही हिरव्या रंगाची प्लेट वापरली जाते. त्यामुळे पेट्रोल – डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनाची वेगळी ओळख पटते.
लाल नंबरचा प्लेटचा अर्थ काय
लाल रंगाची नंबर प्लेट सामान्य वाहनांवर रोजच्या वापरात फारशी दिसत नाही. ही प्रामुख्याने तात्पुरत्या नोंदणीशी संबंधित असते. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक मिळण्यापूर्वी काही परिस्थितींमध्ये वाहनाला तात्पुरता नंबर दिला जातो. या प्लेटवर तात्पुरता नोंदणी क्रमांक असतो आणि तो ठराविक कालावधीसाठी वैध असतो.
निळी नंबर प्लेट कुणाच्या वाहनावर असते
निळी नंबर प्लेटही काही विशेष वाहनांसाठी असते. ती प्रामुख्याने परदेशी दूतावास आणि राजनैतिक मिशनशी संबंधित वाहनांवर दिसते. या वाहनांच्या प्लेटवर सामान्य वाहनांप्रमाणेच साधा रजिस्ट्रेशन नंबर नसून विशेष ओळख दर्शवणारे क्रमांक किंवा कोड असतात.