कोल्हापूरमध्ये पंचगंगेला रौद्ररुप, 12 दिवसांच्या चिमुकल्यासह आईलाही पुराचा फटका

| Updated on: Aug 08, 2019 | 6:25 PM

पुरामुळं आपल्या 12 दिवसांच्या चिमुकल्यासह माहेरी जाणाऱ्या आईला मागील 2 दिवसांपासून मध्येच एका ठिकाणी थांबून राहावं लागलं.

कोल्हापूरमध्ये पंचगंगेला रौद्ररुप, 12 दिवसांच्या चिमुकल्यासह आईलाही पुराचा फटका
Follow us on

कोल्हापूर : सांगली (Sangli) आणि कोल्हापुरात (Kolhapur) आलेल्या महापुरामुळे (Flood) अनेकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. मात्र, आज एका 12 दिवसांच्या चिमुकल्यालाही पंचगंगा नदीच्या पुराचा फटका बसल्याचं समोर आलं. पुरामुळं आपल्या 12 दिवसांच्या चिमुकल्यासह माहेरी जाणाऱ्या आईला मागील 2 दिवसांपासून मध्येच एका ठिकाणी थांबून राहावं लागलं.

पंचगंगा नदीनं (Panchganga River) धोक्याची पातळी ओलांडल्यामुळं कोल्हापूरकडं जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या 12 दिवसांच्या चिमुकल्यासह त्याच्या आईला एनडीआरएफच्या (NDRF) मदतीनं बोटीतून पंचगंगा नदी पार करुन देण्यात आलं.

संबंधित महिला पुरापासून बचाव होण्यासाठी आपल्या मुलासह माहेरी कोल्हापुरात जात होती. मात्र, पंचगंगेच्या पुरामुळं तिला माहेरी जाणं शक्य होत नव्हतं. मागील 2 दिवसांपासून त्यांना वडगाव येथे ठेवण्यात आलं होते. अखेर आज एनडीआरएफच्या मदतीनं बाळ आणि बाळांतीन दोघांना कोल्हापूरात सुखरूप पोहचवण्यात आलं.

दरम्यान, महापुराने कोल्हापूरची चहूबाजूने कोंडी झाली आहे. जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग बंद आहेत. पुणे-बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या 3 दिवसांपासून बंद आहे. त्याचा परिणाम दूध, भाज्या, इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसला आहे. परिणामी कोल्हापूर आणि परिसरातून मुंबई-पुण्याकडे येणाऱ्या दुधावर बसला आहे. इथे दुधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

पेट्रोल-भाजीपाल्याची टंचाई

कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा मोठा फटका शहरी भागात बसत आहे. शहरातील पेट्रोल-भाजीपाल्याची मोठी टंचाई जाणावत आहे. कृष्णा- पंचगंगा नद्यांना महापूर आल्याने दोन्ही नद्यांच्या पात्रांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यात धरणातून पाणी सोडल्यामुळे जिल्ह्यातील 30 ते 35 गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक खेडेगावांना पुराचा वेढा बसला आहे. पूरग्रस्तांना सामाजिक संस्थांकडून मोठी मदत केली जात आहे. शाळा, मंगल कार्यालय, संस्थांनी पूरग्रस्तांना राहण्याची सोय केली आहे.