नागपुरात 24 तासात 12 मृत्यू, उष्माघाताची शक्यता

| Updated on: Jun 06, 2019 | 8:06 AM

नागपुरात गेल्या 24 तासात 12 जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. या बातमीने शहरात एकच खळबळ उडाली आहे. उष्माघाताने हे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नागपुरात 24 तासात 12 मृत्यू, उष्माघाताची शक्यता
Follow us on

नागपूर : विदर्भात सध्या उष्णतेचा कहर सुरु आहे. त्यातच गेल्या 24 तासात नागपुरात 12 जणांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये हे 12 मृतदेह आढळून आले. उष्माघातामुळे या लोकांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शवविच्छेदनानंतर या लोकांच्या मृत्युचं खरं कारण समोर येईल.

शहरातील वाढतं तापमान नागपुरकरांच्या जीवाला धोका ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूरात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 13 वर पोहोचल्याची बातमी आली होती. त्यानंतर आता अवघ्या 24 तासात 12 जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे.

मे महिना संपला तरीही उन्हाचा कहर कमी होताना दिसत नाही. नागपुरात आताही पारा 47 अंश सेल्सिअसच्या वर आहे. त्यामुळे इतक्या उन्हात नागपुरकरांना जगणं कठीण झालं आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. मात्र, विदर्भात पुढील 2 ते 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहाणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा सोसावा लागणार आहे. त्यासाठी हवामान विभागाकडून विदर्भात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सून उशिराने येत असल्याने आणखी काही दिवस विदर्भात उकाडा कायम राहाणार आहे.

विदर्भात मान्सून आठवडाभर उशिराने येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात येत्या 15 ते 16 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असंही हवामान विभागाने सांगितलं.

नागपुरात उष्माघातामुळे अनेक जणांनी जीव गमावला आहे. नागपूरसह चंद्रपुरातही उन्हाने कहर माजवला आहे. चंद्रपुरात 48 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर वर्धेतही तीन दिवसांच्या चीमुकलीसह आईचा उष्माघाताने मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या :

विदर्भात उष्णतेची लाट, मान्सून उशिराने : हवामान विभाग

उष्माघाताने 3 दिवसाच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू?

पुढील 5 दिवस ‘या’ ठिकाणी पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज

“पावसाचा अंदाज चुकला तर हवामान खात्याच्या कार्यालयाला टाळं ठोकू”