राजस्थानमध्ये काँग्रेसने बसपाचे सर्वच्या सर्व सहा आमदार फोडले

| Updated on: Sep 17, 2019 | 6:54 PM

राजस्थानमध्ये काँग्रेसने (Rajasthan Congress) बहुजन समाज पक्षाला (BSP) मोठा धक्का दिला आहे. सोमवारी (16 सप्टेंबर) रात्री राज्यातील बसपच्या सर्व 6 आमदारांनी बसपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राजस्थानमध्ये काँग्रेसने बसपाचे सर्वच्या सर्व सहा आमदार फोडले
Follow us on

जयपूर: राजस्थानमध्ये काँग्रेसने (Rajasthan Congress) बहुजन समाज पक्षाला (BSP) मोठा धक्का दिला आहे. सोमवारी (16 सप्टेंबर) रात्री राज्यातील बसपच्या सर्व 6 आमदारांनी बसपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मायावतींना मोठा झटका बसला आहे. याचे पडसाद आगामी काळात बसप आणि काँग्रेसच्या वाकयुद्धात दिसण्याची शक्यता आहे.

बसप प्रमुख मायावती (Mayavati) यांना याआधी देखील राजस्थानमध्ये धक्के बसले आहेत. 2009 मध्ये देखील बसपच्या सर्व आमदारांनी अशाचप्रकारे पक्ष सोडत काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एका दशकानंतर पुन्हा एकदा याचीच पुनरावृत्ती झाली आहे. हा मायावतींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

डिसेंबर 2018 मध्ये राजस्थानच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, काँग्रेसला बहुमतासाठी एका आमदाराची आवश्यकता होती. त्यावेळी अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली. मात्र, सरकारच्या स्थिरतेवर टांगती तलवार कायम होती. त्यामुळेच काँग्रेसने बसपला सुरुंग लावत 6 आमदारांना पक्षात प्रवेश दिला.

काँग्रेसचा एकूण 99 जागांवर विजय झाला होता. दुसरीकडे भाजला 73 जागांवर यश मिळाले होते. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवारांना 13 जागांवर तर बसपला 6 जागांवर विजय मिळाला. बसपच्या आमदारांच्या काँग्रेस प्रवेशामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार आता स्पष्ट बहुमतात आले आहे. अपक्ष आमदारांच्या कोणत्याही निर्णयाचा आता सरकारच्या स्थिरतेवर थेट परिणाम होणार नाही.