आग्र्यातील नाल्यात बस कोसळली, 29 प्रवाशांचा मृत्यू

| Updated on: Jul 08, 2019 | 8:13 AM

दिल्लीतील आग्रा यमुना एक्सप्रेस वे वर बस नाल्यात  कोसळून 29 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 17 लोक जखमी आहेत. दरम्यान सध्या जवळच्या रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.

आग्र्यातील नाल्यात बस कोसळली, 29 प्रवाशांचा मृत्यू
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीतील आग्रा यमुना एक्सप्रेस वे वर नाल्यात बस कोसळून 29 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 17 लोक जखमी आहेत. ही प्रवाशी बस लखनौहून दिल्लीत येत होती. त्यावेळी आग्र्यातील झरना नाल्यात ही बस कोसळली. दरम्यान सध्या जवळच्या रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस अवध डेपोची प्रवाशी बस होती. लखनौहून दिल्लीकडे येत असताना अचानक यमुना एक्सप्रेस वे वरचे रेलिंग तोडत ही बस नाल्यात कोसळली. या बसमध्ये 44 प्रवाशी सहभागी होते. आतापर्यंत यातील 17 लोकांना बाहेर काढण्यात यश आलं असून जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर जवळपास 29 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालकाचा अचानक डोळा लागला आणि बसचा वेग जास्त असल्याने ती नाल्यात कोसळून भीषण अपघात घडला. दरम्यान बसमध्ये अजून प्रवाशी अडकले आहेत. सध्या या ठिकाणी पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू आहे. तर दुसऱ्या ठिकाणी जखमी झालेल्या प्रवाशांमधील काहींची प्रकृती नाजूक आहे. त्यामुळे मृतांच्या आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेवर  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत.