आजारी असलेल्या मुस्लीम ड्रायव्हरसाठी रोजा ठेवणारा वन अधिकारी

| Updated on: May 31, 2019 | 11:04 PM

बुलडाणा : हिंदू-मुस्लीम एकोप्याचं एक सुंदर उदाहरण बुलडाणा जिल्ह्यात बघायला मिळत आहे. इथे एका हिंदू अधिकाऱ्याने आपल्या मुस्लीम ड्रायव्हरच्या बदल्यात रोजे ठेवले आहेत. सध्या या हिंदू अधिकाऱ्याचे रोजे महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहेत, हिंदू-मुस्लीम सर्वांकडून या अधिकाऱ्याचं कौतुक केलं जात आहे. बुलडाण्याचे विभागीय वन अधिकारी संजय एन. माळी हे आहेत ते हिंदू जे त्यांच्या ड्रायव्हरसाठी […]

आजारी असलेल्या मुस्लीम ड्रायव्हरसाठी रोजा ठेवणारा वन अधिकारी
ramzan
Follow us on

बुलडाणा : हिंदू-मुस्लीम एकोप्याचं एक सुंदर उदाहरण बुलडाणा जिल्ह्यात बघायला मिळत आहे. इथे एका हिंदू अधिकाऱ्याने आपल्या मुस्लीम ड्रायव्हरच्या बदल्यात रोजे ठेवले आहेत. सध्या या हिंदू अधिकाऱ्याचे रोजे महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहेत, हिंदू-मुस्लीम सर्वांकडून या अधिकाऱ्याचं कौतुक केलं जात आहे. बुलडाण्याचे विभागीय वन अधिकारी संजय एन. माळी हे आहेत ते हिंदू जे त्यांच्या ड्रायव्हरसाठी रोजे ठेवत आहेत.

 

संजय माळी यांचा ड्रायव्हर जफर हा एक मुस्लीम आहे. रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. या महिन्यात सर्वच मुस्लीम रोजे ठेवतात. त्यामुळे जफरनेही रोजे ठेवले असावेत असं संजय माळी यांना वाटलं. त्यांनी जफरला रोजे ठेवलेत का, असं विचारलं. तेव्हा जफरने निराश होऊन नाही असं उत्तर दिलं. संजय माळी यांनी जफरला रोजे का ठेवले नाहीत याचं कारण विचारलं. तेव्हा प्रकृती अस्वास्थामुळे तो रोजे ठेवण्यात असमर्थ आहे, असं त्याने सांगितलं. त्याची रोजे ठेवण्याची इच्छा असून तब्येतीमुळे तो ते करु शकला नाही. त्याशिवाय कामासोबत रोजे ठेवणे त्याला अवघड जात होतं.

हे सर्व ऐकल्यानंतर संजय माळी यांच्या डोक्यात एक कल्पना आली. जसे नवरात्राचे उपवास हिंदूंसाठी महत्त्वाचे असतात, तसेच मुस्लिमांसाठी रोजे महत्त्वाचे असतात, हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे जफरच्या जागी ते रोजे ठेऊ शकतात का, असे संजय माळी यांनी जफरला विचारलं.

हे ऐकूण जफर जरावेळ निशब्द झाला. त्याला काय बोलावे सुचेना. ‘तुम्ही रोजे कसे ठेवाल’, असा प्रश्न त्याने संजय माळी यांना केला. त्यावर ‘मी का नाही करु शकत’, असं संजय माळी यांनी जफरला विचारला. एका हिंदूच्या तोंडून रोजे ठेवण्याची गोष्ट ऐकूण जफर भावूक झाला. त्यानंतर त्याने संजय माळी यांना आपली संपूर्ण दिनचर्या सांगितली. रोजे कसे ठेवायचे, कधी सोडायचे हे सर्व समजावून सांगितलं. संजय माळी हे गेल्या 6 मे पासून रोजे ठेवत आहेत. संजय माळी हे रोज पहाटे 4 वाजता उठून थोडफार खातात, त्यानंतर ते संध्याकाळी 7 वाजता रोजा सोडतात.

“सर्वांनी समाजात धार्मिक सलोखा आणि सद्भाव पसरवण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रत्येक धर्म हा काही ना काही चांगलं शिकवतो. माणसाने पहिले माणुसकी त्यानंतर धर्म-जात बघायली हवी”, असा संदेश संजय माळी यांनी दिला. तसेच रोजे ठेवल्यानंतर त्यांना अधिक ताजेतवाणे वाटते असंही त्यांनी सांगितलं.

रोजा काय असतो?

रोजे ठेवण्यासाठी सकाळी सुर्योदयापूर्वी अन्न ग्रहण केलं जातं. याला सेहरी म्हणतात. त्यानंतर दिवसभर पाण्याचा घोटही घेतला जात नाही. संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेवण केलं जातं. याला इफ्तार असं म्हणतात. रमजानचे एका महिन्याचे रोजे पूर्ण झाल्यानंतर ईद हा सण साजरा केला जातो. जूनच्या पहिल्या आठवड्यात ईद असते.