सर आली धावून, दानवेंच्या जालन्यात रस्ता गेला वाहून!

| Updated on: Jun 30, 2019 | 9:15 PM

खासदार रावसाहेब दानवे यांच्या जालना मतदारसंघात रस्ता वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याला भगदाड पडलं आणि रस्ता वाहून गेला.

सर आली धावून, दानवेंच्या जालन्यात रस्ता गेला वाहून!
Follow us on

जालना : खासदार रावसाहेब दानवे यांच्या जालना मतदारसंघात रस्ता वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याला भगदाड पडलं आणि रस्ता वाहून गेला. या घटनेनंतर बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जालन्याच्या भोकरदन तालुक्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. भोकरदन तालुक्यातील वीरेगावात धुव्वाधार पाऊस सुरु होता. मुसळधार पावसात या रस्त्यावरुन लोकांची ये-जा सुरु होती. मात्र, तितक्यात अचानक या रस्त्याला भगदाड पडलं आणि रस्त्याचा काही भाग पाण्यासोबत वाहून गेला. जेव्हा या रस्त्याचा भाग वाहून जात होता तेव्हा यावरुन एक चारचाकी गाडी जात होती. मात्र, सुदैवाने यामध्ये गाडी वाहून गेली नाही. त्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.

या घटनेनंतर रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, रस्ता बांधणाऱ्या अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत. त्याशिवाय, परिसरातील इतर रस्तेही धोकादायक असल्याचं या घटनेनंतर समोर आलं आहे.

या घटनेसंबंधी बांधकाम विभागाच्या सचिवांना पत्र देऊन उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देऊ. तसेच, संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांवर आवश्यक ती कारवाईही करु, असं आश्वासन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलं. त्यासोबतच जालन्यातील नागरिकांनी पावसाळ्यात थोडी खबरदारी घ्यावी, असा सल्लाही अर्जुन खोतकर यांनी ‘टीव्ही-9’च्या माध्यमातून दिला.

महाराष्ट्रात नुकतिच पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही काहीच दिवसांच्या पावसात अनेक ठिकाणी रस्ते खचले, कुठे रेल्वे फलाट खचलं, तर जालन्यात अख्खा रस्ता वाहून गेला. काहीच दिवसांच्या पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. जालन्यातील दुर्घटनेत पावसाचा झोत जास्त असला, पाण्याचा प्रवाह जास्त असला तरी अशाप्रकारे रस्ता वाहून जाणे, यामुळे रस्ता बांधणाऱ्या अभियंत्यांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरु लागली आहे. त्यामुळे आता प्रशासन यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पाहा रस्ता वाहून जातानाचा हा व्हिडीओ :