Mayuri Deshmukh | “आशुडा, अनेक प्रश्न अनुत्तरीत सोडलेस…” मयुरी देशमुखकडून भावनांना वाट मोकळी

| Updated on: Aug 12, 2020 | 9:22 AM

आपल्या प्रियजनांसाठी तू बरेच प्रश्न अनुत्तरीत सोडले आहेस, असे मयुरीने पती आशुतोषसाठी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

Mayuri Deshmukh | आशुडा, अनेक प्रश्न अनुत्तरीत सोडलेस... मयुरी देशमुखकडून भावनांना वाट मोकळी
Follow us on

मुंबई : अभिनेता आशुतोष भाकरे याच्या अकाली निधनानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री मयुरी देशमुख पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. आशुतोषच्या जन्मदिनी (11 ऑगस्ट) केकचा फोटो शेअर करत मयुरीने भावनांना वाट मोकळी करुन दिली. (Actress Mayuri Deshmukh Instagram Post remebering Husband Ashutosh Bhakare)

काय आहे मयुरीची इन्स्टाग्राम पोस्ट?

“आशुडा, तुझ्या वाढदिवशी सर्वोत्तम केक तयार करता यावा, केवळ यासाठी मी लॉकडाऊनच्या काळात 30 केक बेक केले. त्या सर्व 30 केक्सची पहिली चव तू चाखली होतीस, पण हा… 30 वाढदिवस आधीच साजरे करण्याची ही तुझी पद्धत होती का? आपल्या प्रियजनांसाठी तू बरेच प्रश्न अनुत्तरीत सोडले आहेस”

“आम्हाला माहित आहे की तू उचललेले पाऊल भ्याडपणातून नाही, तर असहाय्यतेमुळेच होते, जे नैराश्यासोबत झालेल्या तुझ्या दीर्घकालीन संघर्षातून आले. पण गुणी बाळ माझं ते, आपण त्याला पराभूत करण्याच्या अगदी जवळ आलो होतो आणि तू असे वेड्यासारखे कृत्य केलेस. थोडं आणखी थांबायची आवश्यकता होती.”

“दररोज, प्रत्येक सेकंदाला, थोडासा जास्तीचा संयम, थोडेसे अधिक धैर्य आणि एक दीर्घ, निरोगी, आनंदी आयुष्य वाट पाहत होतं तुझी… आपली”

मला अर्ध्यावर सोडल्याबद्दल मी तुझ्यावर चिडावं की तू त्या वेळात माझा होतास याबद्दल कृतज्ञ असावं?? त्याने काय फरक पडतो? आता कशानेही काय फरक पडतो??

“तुझ्या आत्म्याचा शांततेने प्रवास व्हावा आणि देवदूतांनी तुला योग्य मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थना आम्ही सतत करत आहोत… देवदूतांचे ऐक… आता नेहमीसारखा हट्टीपणा दाखवू नकोस.”

“मी, अभि, मम्मी, पापा तुझ्यावर निरतिशय प्रेम करतो आणि तू आमच्यासोबत असताना आम्ही ते पुरेसे व्यक्त केले असेल, अशी आशा आहे… इतक्या वेदना असूनही तू माझ्यावर खूप प्रेम केले आहेस, मीही तेच करत राहीन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

तुझीच, #बायकोतुझीनवसाची

‘खुलता खळी खुलेना’ या मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आणि अभिनेता आशुतोष भाकरेने 29 जुलैला नांदेडमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी मयुरीसोबत ना मतभेद होते, ना त्याला म्हणावी तशी आर्थिक चणचण होती. तरीही आशुतोषने स्वत:चं आयुष्य संपवल्याने, कुटुंबाला आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आशुतोषने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र त्याला नेमकं कोणतं नैराश्य होतं, याचा उलगडा पोलीस करत आहेत.

हेही वाचा : नैराश्यावर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, उपचारांना प्रतिसाद, तरीही आशुतोषचं टोकाचं पाऊल

नांदेड शहरात अभिनेता आशुतोष भाकरेचं घर आहे. गेल्या काही दिवसांपासून आशुतोष आणि अभिनेत्री मयुरी देशमुख इथेच राहत होते. आशुतोष आणि मयुरी यांचा 4 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आशुतोष आणि मयुरी हे दोघेही सुखवस्तू कुटुंबातील. दोघांनाही कलाक्षेत्राची मोठी आवड. दोघांची आवड एकच असल्याने दोघांचा संसारही सुखात सुरु होता.

आशुतोषचं करिअर

आशुतोषने अभिनेता भारत जाधवसोबत ‘इच्चार करा पक्का’ या मराठी चित्रपटात सहकलाकाराची भूमिका केली होती. त्यानंतर त्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या सांगणाऱ्या भाकरी या मराठी चित्रपटात नायकाची भूमिका केली होती. हळूहळू आशुतोष दिग्दर्शन क्षेत्राकडेही वळला होता.

आशुतोषची पत्नी मयुरी देशमुख ही खुलता कळी खुलेना या टीव्ही सीरियलमुळ घराघरात पोहोचली. पती-पत्नी दोघेही मुंबईला स्थायिक होते. मागच्या महिन्याभरापूर्वी हे कलावंत दाम्पत्य नांदेडला घरी आलं. नांदेडमधील गणेश नगर इथल्या घरी मयुरी आणि आशुतोषची आई घरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराचवेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने, दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिलं. त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि एकच थरकाप उडाला.

संबंधित बातम्या 

Ashutosh Bharke Suicide | अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीचा नांदेडमध्ये गळफास   

ना मतभेद, ना आर्थिक चणचण, मयुरीचा पती आशुतोषच्या आत्महत्येचं कारण काय.?