‘मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे’, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

| Updated on: Jan 29, 2020 | 11:56 PM

मुंबईत नाईट लाईफ सुरु झाल्यानंतर तो पूण्यात लागू होणार का, या प्रश्नावर उत्तर देताना पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुणेकरांना मिष्किल टोला लगावला होता.

मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे, आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण
Follow us on

पुणे : मुंबईत नाईट लाईफ सुरु झाल्यानंतर ती पूण्यात लागू होणार का, या प्रश्नावर उत्तर देताना पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुणेकरांना मिष्किल टोला लगावला होता (Aditya Thackeray On Pune). त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे”, असं ते म्हणाले. आदित्य ठाकरेंनी आज पुण्यात ‘कार्बन न्यूट्रल 2030 कॉन्फरन्स’नंतर माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्याच्या आफ्टरनून लाईफ वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे (Pune Afternoon Life).

“गमतीवर कशी काय निगेटिव्ह रिअॅक्शन असू शकते. पुणेकरांना तो जोक असल्याचं माहित आहे. पुणेकर स्वतःही जोक्स करतात. याप्रकरणी तुम्ही वेगळा अर्थ लावून हा मुद्दा विनाकारण खेचू नका. मी काय बोललो हे पुणेकरांना माहित आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आफ्टरनून लाईफचं प्रकरण काय?

राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी (22 जानेवारी) मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत आदित्य ठाकरे यांनी पुणेकरांना मिष्किल टोला लगावला.  नाईट लाईफचा निर्णय पुण्यात लागू होणार का? असा प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर आदित्य ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता पुण्यात पहिले ‘आफ्टरनून लाईफ’ सुरु करुयात, असा टोला लगावला होता. आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

‘पुणे कार्बन न्यूट्रल 2030 कॉन्फरन्स’

“पुण्यात इको-फ्रेण्डली मटेरिअल वापरले जातात. त्यामुळे महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते”, असं मत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. पुण्यात ते ‘कार्बन न्यूट्रल 2030 कॉन्फरन्स’नंतर माध्यमांशी बोलत होते. पुणे ‘कार्बन न्यूट्रल’ करण्यासाठी 2030 लक्ष आहे. मात्र, पुणे 2025 मध्येच ते पूर्ण करेन, अशी अपेक्षा यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.