मराठवाड्यात 30 जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडणार : बबनराव लोणीकर

| Updated on: Jul 18, 2019 | 4:45 PM

येत्या 30 जुलैनंतर महाराष्ट्रात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होईल, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. सध्या विविध चाचण्या केल्या जात असून त्यानंतरच पाऊस पाडता येऊ शकतो का ते स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.

मराठवाड्यात 30 जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडणार : बबनराव लोणीकर
Follow us on

जालना : पावसाने हुलकावणी दिल्यामुळे कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष सुरु आहे. त्यामुळे येत्या 30 जुलैनंतर महाराष्ट्रात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होईल, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. सध्या विविध चाचण्या केल्या जात असून त्यानंतरच पाऊस पाडता येऊ शकतो का ते स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विविध 10 परवानग्या लागतात, ज्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय. केंद्र सरकारकडून 30 जुलैपर्यंत परवानग्या मिळतील आणि त्यानंतर पाऊस पाडण्याचा प्रयोग सुरु होईल, असं बबनराव लोणीकर म्हणाले. या प्रयोगासाठी अगोदरच कॅबिनेटने 30 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. आता परवानग्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिवांकडून पाठपुरावा केला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.

यापूर्वीही कृत्रिम पावसाचा प्रयोग

कृत्रिम पावसासाठी आवश्यक असणारे रडार औरंगाबादमधील विभागीय आयुक्तालयात बसवण्यात आले आहेत. यापूर्वी दोन वेळा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात आला होता. पण त्याला अपेक्षित यश आलं नाही. आता तिसऱ्यांदा हा प्रयोग केला जाणार आहे. पण यातून किती यश मिळेल याबाबत कोणतीही शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांची धाकधूक कायम आहे.

राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतला होता आणि कृत्रिम पावसासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीडिंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

दुबार पेरणीचं संकट, पिण्यासाठीही पाणी नाही

मराठवाडा आणि विदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे यावर्षीही नापिकीचं संकट आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात पाण्यासाठी जो संघर्ष करावा लागला, तोच संघर्ष अजूनही मराठवाड्यातील बहुतांश भागात सुरु आहे. धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झालाय.