जवान औरंगजेबच्या हत्येचा बदला, हत्येत सहभागी दहशतवाद्याचा सैन्याकडून खात्मा

| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यात सैन्याने भारतीय जवान औरंगजेबच्या हत्येत सहभागी असणाऱ्या दहशतवाद्याचाही खात्मा केला. शौकत अहमद डार असे या दहशतवाद्याचे नाव आहे. डार 2018 मध्ये जवान औरंगजेबच्या हत्या करणाऱ्या दहशतवादी गटात सहभागी होता, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली. डार विरोधात अनेक […]

जवान औरंगजेबच्या हत्येचा बदला, हत्येत सहभागी दहशतवाद्याचा सैन्याकडून खात्मा
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यात सैन्याने भारतीय जवान औरंगजेबच्या हत्येत सहभागी असणाऱ्या दहशतवाद्याचाही खात्मा केला. शौकत अहमद डार असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

डार 2018 मध्ये जवान औरंगजेबच्या हत्या करणाऱ्या दहशतवादी गटात सहभागी होता, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली. डार विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिली. दहशतवाद्यांनी मागील वर्षी जुनमध्ये ईदसाठी पुंछ येथे घरी जाणाऱ्या जवान औरंगजेबचे पुलवामामध्ये अपहरण आणि हत्या केली होती. यानंतर शहीद औरंगजेबला  शौर्य चक्राने सन्मानित केले होते.

ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अंवतीपोरातील पंजगामच्या शौकत अहमद डारसह सोपोरच्या वदूरा पायीन येथील इरफान वार आणि पुलवामामधील तहाबच्या मुजफ्फर शेखचा समावेश आहे. हे दहशतवादी बंदी घालण्यात आलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचे सदस्य आहेत.

औरंगजेब कोण होते?

औरंगजेब खान भारतीय सैन्याच्या 44 राष्ट्रीय रायफल्समध्ये होते. ते हिज्बुलचा दहशतवादी समीर टाइगरच्या एनकाउंटरमध्ये सहभागी होते. जम्मू आणि काश्मीर लाईट इंन्फंट्रीमध्ये रायफलमॅन असलेले औरंगजेब मेजर शुक्ला यांचे खासगी सुरक्षारक्षक होते. मेजर शुक्ला आणि त्यांच्या टीमने बुरहान वानीचे साथीदार सद्दाम पेंढर आणि समीर टाइगरचे एनकाउंटर केले होते.

औरंगजेब जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील कसबलरी सलनी गावचे रहिवासी होते. मागील वर्षी ईदनिमित्त त्यांना 3 दिवसांची छुट्टी मिळाली होती. सैन्याच्या छावणीतून सुट्टीसाठी घरी जाताना त्यांनी एका खासगी गाडीकडून लिफ्ट घेतली. तेथून त्यांना मुगल रोडमार्गे घरी जायचे होते. मात्र, कलामपुरा गावाजवळ सशस्त्र दहशतवाद्यांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यांचे अपहरण केले.

यानंतर संबंधित गाडी चालकाने अपहरणाची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलाने जवान औरंगजेबची शोधमोहिम सुरु केली. घटनास्थळापासून 10 किलोमीटर अंतरावर गुस्सू गावात जवान औरंगजेबचा मृतदेह मिळाला. औरंगजेबला दहशतवाद्यांनी 15 गोळ्या झाडल्या. औरंगजेबचे कुटुंब मोठ्या काळापासून सेन्याशी जोडले गेलेले आहे. औरंगजेबचे वडिल सैन्यातून निवृत्त झालेले आहे.