प्रोमोतील गाणं चित्रपटात नाही, औरंगाबादच्या शिक्षिकेच्या याचिकेवर ‘यशराज’ला दणका

| Updated on: Feb 20, 2020 | 10:39 AM

फॅन' चित्रपटाचे निर्माते 'यशराज फिल्म्स'विरोधात औरंगाबादच्या शिक्षिकेने तक्रार दाखल केली होती. आपल्याला 58 हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तिने तक्रारीत केली

प्रोमोतील गाणं चित्रपटात नाही, औरंगाबादच्या शिक्षिकेच्या याचिकेवर यशराजला दणका
Follow us on

नवी दिल्ली : प्रोमोमध्ये दिसणारी गाणी पाहून चित्रपट पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी नाही. ‘फॅन’ सिनेमाच्या प्रोमोमधलं गाणं प्रत्यक्ष चित्रपटात न दाखवल्याने ‘यशराज फिल्म्स’ कंपनीला ग्राहक आयोगाने दणका दिला आहे. औरंगाबादच्या तक्रारदार शिक्षिकेला 15 हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश (Aurangabad Teacher Fan Movie) देण्यात आले आहेत.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘फॅन’मधील गाणं प्रोमोमध्ये दाखवलं होतं. हे गाणं पाहून औरंगाबादची ‘जबरा फॅन’ शिक्षिका आफरीन फातिमा जैदी चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. आफरीनने 15 एप्रिल 2016 रोजी ‘फॅन’ सिनेमाचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ सहकुटुंब पाहिला. मात्र ज्या गाण्याच्या ओढीने आलो, ते गाणंच पाहायला न मिळाल्याने 27 वर्षीय आफरीन काहीशी खट्टू झाली.

औरंगाबादमधील एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या आफरीन जैदीने जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेतली. ‘फॅन’ चित्रपटाचे निर्माते ‘यशराज फिल्म्स’विरोधात तिने तक्रार दाखल केली. आपल्याला 58 हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तिने तक्रारीत केली. परंतु जिल्हास्तरीय ग्राहक मंचाने जैदीची याचिका फेटाळली. त्यामुळे तिने थेट महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाचा दरवाजा ठोठावला.

राज्य ग्राहक आयोगाने ‘यशराज फिल्म्स’ला दणका दिला. आफरीनच्या तक्रारीत तथ्य असल्याचं सांगत, खटला दाखल करण्यासाठी आलेल्या खर्चाचे 5 हजार रुपये आणि 10 हजार रुपयांची नुकसान भरपाई, असे 15 हजार रुपये शिक्षिकेला देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने ‘यशराज’ला दिले.

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेता शाहबाज खानविरोधात विनयभंगाचा गुन्हा

‘यशराज फिल्म्स’ने महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाच्या निर्णयाला राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात आव्हान दिलं. परंतु राष्ट्रीय ग्राहक आयोगानेही यशराज कंपनीला दिलासा देण्यास नकार दिला. राज्य आयोगाचा मागील निर्णय कायम ठेवत शिक्षिकेला 15 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

चित्रपटातून गाणे काढून टाकणे ही एक अयोग्य व्यावसायिक पद्धत असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. जाहिरातीतील गाणे पाहिल्यानंतर एखाद्या प्रेक्षकाने चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. जर ते गाणे दिसत नसेल, तर तो स्वतःची फसवणूक झाल्याचं समजणं साहजिक आहे. अशामुळे प्रेक्षक निराश होऊन वैतागतो. प्रेक्षकांना सिनेमागृहात आणून नफा मिळविणे हा सिनेनिर्मात्यांचा हेतू असल्याचं स्पष्ट दिसतं, असे ताशेरे ग्राहक आयोगाने ओढले. (Aurangabad Teacher Fan Movie)