साखर कारखाने तातडीने सुरु करण्याचे प्रयत्न, पण यंदा गाळप हंगाम लांबण्याची शक्यता- सहकारमंत्री

| Updated on: Oct 19, 2020 | 2:19 PM

राज्यातील साखर कारखाने लवकर सुरु करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. त्याबाबत आपण राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याचं शरद पवार आज म्हणाले. त्यावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही कारखाने तातडीनं सुरु करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचं सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं. पण यंदा उसाचा गाळप हंगाम लांबण्याची शक्यता असल्याचं पाटील म्हणाले.

साखर कारखाने तातडीने सुरु करण्याचे प्रयत्न, पण यंदा गाळप हंगाम लांबण्याची शक्यता- सहकारमंत्री
Follow us on

नांदेड: उसाच्या गाळप हंगामावर कोरोनाचं सावट अद्याप कामय आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर पेटवण्यात येत आहेत. काही कारखाने सुरुही झाले पण अतिवृष्टीमुळं यंदाचा गाळप हंगाम लांबण्याची शक्यता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. अशावेळी राज्य सरकार आणि बँका साखर कारखान्यांना लागेल ते सहकार्य करतील, अशी ग्वाही सहकारमंत्र्यांनी दिली आहे. कराडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर आज बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पेटवण्यात आला. त्यावेळी यंदाचा गाळप हंगाम लांबण्याची शक्यता पाटील यांनी व्यक्त केली आहे. ( Sugarcane crushing season is likely to be extended this year said Balasaheb Patil)

गेल्या हंगामात सर्वच साखर उद्योगावर कोरोनाचा परिणाम झाला. कारखान्यांचे कामगार, ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. लॉकडाऊनमुळं वाहतूक यंत्रणेवरही परिणाम झाला होता. मात्र अशा स्थितीतही मागचा हंगाम पार पडल्याचं पाटील म्हणाले. राज्यातील अडचणीत सापडलेल्या कारखान्यांना थकहमी देऊन ते सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळं हे कारखाने सुरु करुन, राज्यातील सर्व उसाचं गाळप करण्याचं आव्हान राज्य सरकारसमोर असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. त्याचवेळी जास्त कारखाने सुरु झाल्यास ऊसतोड कामगारांची कमतरता भासण्याची शक्यताही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

कारखाने लवकर सुरु करण्याचे प्रयत्न- पवार

अतिवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं शेकडो हेक्टरवरील उभा ऊस आडवा झालाय. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. अशावेळी उस्मानाबादसारख्या जिल्ह्यातील कारखाने लवकर सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत आपण सरकारशी बोलणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. दुसरीकडे सहकारमंत्र्यांनीही राज्यातील कारखाने लवकर सुरु करण्यासाठी सरकारचे प्रय़त्न सुरु असल्याचं सांगताना यंदाचा गाळप हंगाम मात्र लांबण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

कारखान्यांना थकहमी, मग शेतकऱ्यांबाबत हात आखडता का?

राज्य सरकार अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना थकहमी देत आहे. मग अतिवृष्टीमुळं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांबाबत हात आखडता का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विचारला आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शेट्टी आज पंढरपुरात आहेत. त्यावेळी सरकारनं कुठलीही अट न ठेवता शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी रुपयांच्या मदतनिधीची घोषणा करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

साखर कारखानदारांना पैसे देता मग शेतकऱ्यासांठी आखडता हात का?; राजू शेट्टींचा उद्धव ठाकरेंना सवाल

केंद्रानं राज्याचं देणं द्यावं, मदतीसाठी हात पसरावे लागणार नाही; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना झापलं

Sugarcane crushing season is likely to be extended this year said Balasaheb Patil