पुरातही संसार वाचला, उजेडासाठी लावलेल्या पेटत्या मेणबत्तीमुळे फ्रीजचा स्फोट

| Updated on: Aug 19, 2019 | 8:46 AM

आधी पुराच्या पाण्याने घर वेढलं, त्यातून सावरत असताना पेटती मेणबत्ती पडून फ्रीजचा स्फोट झाला. यामुळे जैना कुटुंबियांचे घरआगीच्या (Fridge Blast) भक्ष्यस्थानी पडलं आहे.

पुरातही संसार वाचला, उजेडासाठी लावलेल्या पेटत्या मेणबत्तीमुळे फ्रीजचा स्फोट
Follow us on

कोल्हापूर : संकट एकदा येऊ लागली की ती पाठलाग सोडत नाहीत असं म्हटलं जातं. असाचं काहीसा दुर्दैवी अनुभव कोल्हापूरच्या (Kolhapur) शिरोळ तालुक्यातील आलास येथे राहणाऱ्या जैना कुटुंबियांना आला आहे. आधी पुराच्या पाण्याने घर वेढलं, त्यातून सावरत असताना पेटती मेणबत्ती पडून फ्रीजचा स्फोट झाला. यामुळे जैना कुटुंबियांचे घरआगीच्या (Fridge Blast) भक्ष्यस्थानी पडलं आहे. या घटनेत जैना कुटुंबियांचा संसार उघड्यावर पडला असून जवळपास 7 ते 8 लाखांचे नुकसान झालं आहे. आगीमुळे उघड्यावर पडलेला संसार पाहून सर्वांचेच डोळे पाणवले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात आलेल्या महापुराचा फाटला शिरोळ तालुक्यातील आलास गावाला ही बसला. याच गावात राहणाऱ्या मुनाफ गौस जैनां व जैणूनबी अब्बास जैना ही दोन विभक्त कुटुंबे राहतात. मुनाफ हे घरातीलच एका जुन्या पावभट्टीवर पाव तयार करण्याचे काम करतात. गावोगावच्या बाजारात पाव विकून ते आपला उदरनिर्वाह करत. तर जैणूनबी हे मोलमजुरीची काम करतात.

पुराचं पाणी घरात शिरल्याने जैनां कुटुंबीय कर्नाटकमध्ये नातेवाईकांकडे राहण्यास गेले होते. शनिवारी पूर ओसरल्यावर सर्वजण राहत्या घरी परत आले. घरातील अस्ताव्यस्त पडलेलं साहित्य एकत्र करून त्याची घराची साफसफाई केली. पुरामुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज घेऊन त्यांनी पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला होता. मात्र गावातील वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे त्यांनी रात्री उजेडासाठी मेणबत्ती पेटवली आणि मेणबत्ती पेटवून सर्वजण झोपले. मात्र हीच मेणबत्ती जैना कुटुंबियांसाठी नवं संकट घेऊन आली.

पेटती मेणबत्ती पडून आधी फ्रीज आणि मग संपूर्ण घरानेच पेट घेतला. हा प्रकार लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला होता. रात्रीच्या अंधारातही शेजाऱ्यांनी धावपळ करत आग विजवली. मात्र तोपर्यत जैनां कुटुंबियांची घरे उघड्यावर आली होती. या आगीमुळे रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, पावभट्टी सगळं काही नष्ट झाले.

दरम्यान या घटनेत दोन्ही कुटुंबियांच्या प्रापंचिक साहित्यासह सात ते आठ लाखांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या राख झालेल्या घराकडे पाहून सर्वांचेच डोळे पणावत आहेत.