चंद्रपुरात होळीच्या दिवशी सापडलेल्या मानवी पायाचं गूढ उकलण्यात अखेर यश

| Updated on: Mar 12, 2020 | 11:34 AM

चंद्रपुरात सापडलेला महिलेचा पाय हा रुग्णाला गँगरीन झाल्यामुळे रुग्णालयाने काढून उघड्यावर टाकलेला असल्याचं स्पष्ट झालं आहे. Chandrapur Human Leg Mystery Solved

चंद्रपुरात होळीच्या दिवशी सापडलेल्या मानवी पायाचं गूढ उकलण्यात अखेर यश
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपुरात आढळलेल्या मानवी पायाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. एखाद्या रुग्णाला गँगरीन झाल्यामुळे रुग्णालयाने पाय काढून अयोग्य पद्धतीने टाकल्याचं स्पष्ट झालं आहे. शहरातील तुकूमच्या विधी महाविद्यालय परिसरात पॉलिथिनमध्ये गुंडाळलेला महिलेचा पाय आढळला होता. होळीच्या दिवशी म्हणजेच सोमवार 9 मार्चला हा प्रकार उघडकीस आला होता. (Chandrapur Human Leg Mystery Solved)

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतर पायासंबंधी निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे पोलिसांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. कोणत्या रुग्णालयाने हलगर्जी करत मानवी पाय उघड्यावर टाकला याचा तपास सुरु आहे. मानवी अवशेषांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणं अपेक्षित असताना रुग्णालयाच्या भोंगळ कृत्याने संताप व्यक्त होत आहे.

चंद्रपूर शहरातील तुकूमच्या विधी महाविद्यालय परिसरात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील पाय आढळला होता. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसही चक्रावून गेले होते. प्राथमिकतः महिलेचा पाय असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे बेपत्ता महिला-तरुणींचा शोध सुरु करण्यात आला होता.

हेही वाचा : सांगलीत आई-वडील, बहिणीची धारदार शस्त्राने हत्या, 58 वर्षीय मुलावर संशय

तुकूम परिसरात मांस विक्रीची काही दुकाने आहेत. घटनास्थळाजवळ कोंबडी आणि बकरे यांच्या कापलेल्या तुकड्यांचे अवशेषही मोठ्या प्रमाणावर आढळले होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.

पायाच्या शेजारी रुग्णालयात वापरले जाणारे एप्रन, सर्जिकल सीझर (कात्री) आणि सर्जिकल ग्लोव्हज (हातमोजे) आढळून आले होते. त्यावरुन पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली होती.

पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांना अहवाल देण्यास सांगितलं होतं. त्यानुसार हा पाय एखाद्या रुग्णालयात गँगरीन झाल्याने काढून टाकलेला असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी तपासणी करत हा निष्कर्ष काढला.

कोणत्या रुग्णालयाने हलगर्जी करत मानवी पाय शल्यक्रिया झाल्यावर उघड्यावर टाकला याचा तपास सुरु करण्यात आला आहे. मानवी अवशेषांची शास्त्रीय विल्हेवाट अपेक्षित असताना रुग्णालयाची भोंगळ कृती संतापजनक ठरली असून दोषी रुग्णालय शोधून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (Chandrapur Human Leg Mystery Solved)