चीन-रशिया अंतर केवळ आठ मिनिटांवर, पहिली आंतरराष्ट्रीय केबल कार

| Updated on: Aug 03, 2019 | 4:39 PM

चीन आणि रशिया या दोन देशांना जोडणाऱ्या केबल कारचं काम पुढच्या वर्षापासून सुरु होणार आहे. दोन देशांमधील अंतर अवघ्या आठ मिनिटांत कापलं जाणार आहे

चीन-रशिया अंतर केवळ आठ मिनिटांवर, पहिली आंतरराष्ट्रीय केबल कार
Follow us on

बीजिंग : चीन आणि रशियातील नागरिकांना आता अवघ्या आठ मिनिटांत आंतरराष्ट्रीय सफर करता येणार आहे. या दोन देशांना जोडणारी केबल कार (China Russia Cable Car) लवकरच बांधण्यात येणार आहे. जगातील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय केबल (Cross Border Cable Car) कार ठरणार आहे.

चीनच्या पूर्वोत्तर भागातील हेइहे शहर आणि रशियातील ब्लागोवेशचेंस्कला जोडणारी केबल कार बांधण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे दोन देशांच्या सीमेवरील आमूर नदीवरुन हा हवाई प्रवास घडणार आहे. ही नदी हिवाळ्यात पूर्णपणे गोठलेली असते.

कशी असेल केबल कार?

प्रत्येक केबल कारमध्ये चार केबिन असतील. या केबल कारमधून एका वेळी 60 पर्यटक प्रवास करु शकतील. प्रत्येक 15 मिनिटांनी केबल कारची फेरी असेल. दोन आंतरराष्ट्रीय मार्ग यासाठी तयार केले जाणार आहेत. दोन शहरांमधील अंतर केवळ आठ मिनिटांवर येणार आहे. ही केबल कार नॉनस्टॉप गेल्यास हा प्रवास साडेतीन मिनिटांचा असेल.

2020 मध्ये प्रकल्पाचं अनावरण

चीन आणि रशियामधील हा प्रकल्प पुढच्या वर्षी सुरु होणार आहे. या केबल कारचा आनंद घेण्यासाठी फक्त चीन-रशियातीलच नाही, तर जगभरातील कोट्यवधी पर्यटक उत्सुक आहेत.

रशियातील ‘स्ट्रेल्का केबी’ ही नगर रचना सल्लागार कंपनी या प्रकल्पावर काम करत आहे. रशियाने ‘यूएन स्टुडियो’ला या प्रकल्पाचं कंत्राट दिलं आहे. टर्मिनलजवळ रेस्टॉरंट, स्काय गार्डनही तयार केलं जाणार आहे. चीनकडून अद्याप केबल कार टर्मिनलच्या निर्मात्यांविषयी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

केबल कार ही सार्वजनिक वाहतुकीचा अनोखा पर्याय असेल, असं मत ‘यूएन स्टुडियो’चे संस्थापक बेन वान बर्केल यांनी व्यक्त केलं आहे. केबल कार ही वेगवान आणि ऊर्जेची बजत करणारी वाहतूक व्यवस्था असल्याचंही ते म्हणाले. ‘यूएन स्टुडियो’ने आतापर्यंत स्वीडन, गोथनबर्ग आणि नेदरलँड्समध्ये केबल कार टर्मिनलचं डिझाईन केलं आहे.