भारताला ‘हिंदुस्थान’ म्हटल्याने मुख्यमंत्र्यांना पुणे कोर्टाचा समन्स

| Updated on: Jan 07, 2020 | 12:52 PM

दैनिक सामना'मधून भारताचा उल्लेख वारंवार 'हिंदुस्थान' असा केला जातो, याला पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.

भारताला हिंदुस्थान म्हटल्याने मुख्यमंत्र्यांना पुणे कोर्टाचा समन्स
Follow us on

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मधून भारताचा उल्लेख हा हिंदुस्थान असा करण्यात येत असल्याने पुणे कोर्टाकडून ठाकरे आणि राऊत या दोघांविरोधात याचिका दाखल (CM Uddhav Thackeray Summoned) करण्यात आली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मधून भारताचा उल्लेख वारंवार ‘हिंदुस्थान’ असा केला जातो. याला पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. पाटील यांनी या प्रकरणी पुणे न्यायालयात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केली.

पुणे न्यायालयाने सोमवारी ही याचिका दाखल करुन घेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांना समन्स बजावलं. या दोघांनाही 11 फेब्रुवारीला पुणे न्यायलायात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हेमंत पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी ही याचिका दाखल केली होती.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं होतं. ‘सामना’ हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. मात्र एकाच वेळी दोन पदांवर राहू शकत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चं संपादकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आधी कार्यकारी संपादक असलेले संजय राऊत ‘सामना’चे संपादक असतील.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 23 जानेवारी 1988 रोजी ‘सामना’ या दैनिकाची सुरुवात केली. पाच वर्षांनी हिंदी भाषेत ‘दोपहर का सामना’ सुरु करण्यात आला. ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना वेळोवेळी आपल्या भूमिका मांडत आली आहे. सडेतोड टीकेपासून स्तुतिसुमनांपर्यंत विविधांगी अग्रलेख ‘सामना’त वाचायला मिळतात. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना ‘सामनाचे संस्थापक संपादक’ असं पद बहाल केलं.

CM Uddhav Thackeray Summoned