सर्वसामान्यांच्या खिशाला भुर्दंड, सीएनजी-एटीएफ विक्रमी दरवाढ; रस्ते ते विमान प्रवास महागणार!

| Updated on: May 16, 2022 | 7:46 PM

वैयक्तिक तसेच व्यावसायिक प्रवासासाठी महत्वाच्या असणाऱ्या सीएनजी आणि एटीएफचे दर पुन्हा उंचावले आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine crisis) कच्चे तेल व नैसर्गिक वायूत भाववाढ झाली आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला भुर्दंड, सीएनजी-एटीएफ विक्रमी दरवाढ; रस्ते ते विमान प्रवास महागणार!
Follow us on

नवी दिल्लीः घरगुती वापराच्या वस्तूंपासून हवाई प्रवासाचे (AIR TRAVEL RATE) दर महागले आहेत. सर्वसामान्यांना महागाईच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. वैयक्तिक तसेच व्यावसायिक प्रवासासाठी महत्वाच्या असणाऱ्या सीएनजी आणि एटीएफचे दर पुन्हा उंचावले आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine crisis) कच्चे तेल व नैसर्गिक वायूत भाववाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी सीएनजीच्या भावात प्रति किलो दोन रुपये भाववाढ नोंदविली गेली. गेल्या दोन महिन्यात एकूण 12 वेळा सीएनजी दरात वाढ नोंदविली गेली आहे. 7 मार्च पासून आजच्या तारखेपर्यंत सीएनजी दरांत 17.6 रुपये प्रति किलो भाववाढ झाली आहे. गेल्या एक वर्षात सीएनजीच्या भावात प्रती किलो 30.21 रुपये भाववाढ नोंदविली गेली आहे.

भाडे महागणार:

सीएनजीचे दर (CNG RATE) महागल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर थेट परिणाम दिसून आला आहे. बस सेवा, ऑटो, टॅक्सीचं भाड यामध्ये दरवाढ करण्यात आली आहे. सीएनजी भाववाढ सातत्याने सुरू राहिल्यास सर्वसामान्यांसोबत मध्यमवर्गाला मोठा फटका बसणार आहे.

हवाई खर्च महागणार:

केवळ रस्त्यावरील वाहतूकच नव्हे हवाई प्रवासही महागणार आहे. विमान इंधन (एटीएफ) 5.3 टक्क्यांनी महागला आहे. चालू वर्षात आतापर्यंत एटीएफ दरात दहावी दरवाढ आहे. राजधानी दिल्लीत एटीएफचे दर प्रति किलोलीटर 6,188 रुपयांनी महागले आहे. सध्या एटीएफचे दर प्रती लीटर 1 लाख 23 हजार 39 रुपयांवर पोहोचले आहेत. विमान वाहतूक कंपन्यांच्या संनियंत्रणात एटीएफची भागीदारी तब्बल 40 टक्क्यांची असते. त्यामुळे विमानाच्या इंधनासाठी अधिक पैसे खर्च करावे लागल्यास त्याचा थेट परिणाम विमान कंपन्यांच्या तिकिटावर होणार आहे. त्यामुळे देशातील विमान कंपन्यांनी तिकिटाच्या दरात वाढ केल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

युद्धामुळे भाव गगनाला

कच्च्या तेलाच्या किंमतीचा थेट परिणाम खाद्यपदार्थांच्या भाववाढीवर झाला आहे. दैनंदिन जीवनातील महत्वाचा घटत असलेल्या गव्हाच्या पिठाच्या दरात 1 जानेवारीपासून आतापर्यंत 5.81 टक्के दरवृद्धी झाली आहे. यामध्ये उच्चांकी पातळी एप्रिल महिन्यात गाठण्यात आली. एप्रिल महिन्यात गव्हाच्या पिठाचे दर सर्वात उच्चांकी पातळीवर गेल्याचे दोन वर्षात समोर येत आहे. सर्वच क्षेत्रातील महागाईसाठी रशिया-युक्रेन युद्धाला कारणीभूत ठरविण्यात येत आहे. गव्हाच्या पिठाचे दर वाढीचे खापर ही या दोन देशाच्या संघर्षावर फोडण्यात येत आहे. विशेष म्हणजे या युद्धामुळे डिझेलचे दर वाढले असून वाहतूक खर्चात झालेली वाढ गव्हाच्या किंमतीवर आणि पिठाच्या किंमतीवर झाला आहे.