अभिनंदनच्या मिशांना ‘राष्ट्रीय मिशा’ घोषित करा, काँग्रेस नेत्याची मागणी

| Updated on: Jun 24, 2019 | 4:30 PM

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशांना राष्ट्रीय मिशा म्हणून घोषित करण्याची उपरोधिक मागणी केली.

अभिनंदनच्या मिशांना ‘राष्ट्रीय मिशा’ घोषित करा, काँग्रेस नेत्याची मागणी
Follow us on

नवी दिल्ली: लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर जोरदार चर्चा झाली. सोबतच भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचाही विषय चांगलाच गाजला. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीत विंग कमांडर अभिनंदन यांच्या नावाचा उपयोग केल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर सडकून टीका केली. तसेच अभिनंदनच्या मिशांना राष्ट्रीय मिशा म्हणून घोषित करण्याची उपरोधिक मागणी केली.

ओडिशाचे खासदार आणि मोदी कॅबिनेटमधील राज्यमंत्री प्रताप सारंगी यांनी विरोधीपक्षांवर सैन्याच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्याचा आणि पुरावे मागितल्याचा आरोप केला. त्यानंतर उत्तर देताना रंजन चौधरी म्हणाले, “विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पुरस्कार द्यायला हवा. तसेच त्यांच्या मिशांना राष्ट्रीय मिशा म्हणून घोषित करायला हवे.”

अधीर रंजन यांनी यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधींवरील व्यक्तिगत हल्ल्यांविषयी देखील भाष्य केले. ते म्हणाले, “जर सोनिया आणि राहुल गांधी चोर आहे, तर मग ते येथे संसदेत कसे बसलेले आहेत. जर त्यांनी काही चुकीची गोष्ट केली आहे, तर मग तुम्ही त्यांना तुरुंगात का टाकले नाही. आता तर येथे पंतप्रधान आणि गृहमंत्री देखील बसलेले आहेत.”

पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राईक केले होते. यानंतर पाकिस्ताननेही भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानच्या घुसखोरीला अभिनंदन यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले होते. तेव्हापासून अभिनंदन चर्चेत आले. अभिनंदन यांनी मिग 21 या विमानाच्या सहाय्याने पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते. मात्र, ते पाकिस्तानमध्ये अडकले. पाकिस्तानमधून सुटका झाल्यानंतर अभिनंदन यांच्यावर उपचार करण्यात आले. आता तंदुरुस्त होऊन ते पुन्हा सेवेत दाखल झाले आहेत. त्यांच्या या शौर्यासाठी अभिनंदन यांना वीरचक्र पुरस्काराने गौरवण्याची शिफारस वायूदलाने केंद्र सरकारकडे केली आहे.