ट्रॅफिक पोलिसांच्या ई-चलानमुळे प्रेमी युगुलाचं लग्न ठरलं

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

गांधीनगर : गुजरातच्या अहमदाबाद येथे ट्रॅफिक पोलिसांच्या ई-चलानमुळे एक अनोखी प्रेम कहाणी जुळून आली आहे. ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अहमदाबादच्या एका तरुणाच्या घरी ई-चलान पाठवलं. तेव्हा त्याच्या कुटुंबियांना तो एका मुलीवर प्रेम करत असल्याचं कळालं. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने या प्रेमीयुगुलाचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर या तरुणाने चलान पाठवण्यासाठी अहमदाबाद पोलिसांचे आभार मानले. काय […]

ट्रॅफिक पोलिसांच्या ई-चलानमुळे प्रेमी युगुलाचं लग्न ठरलं
Follow us on

गांधीनगर : गुजरातच्या अहमदाबाद येथे ट्रॅफिक पोलिसांच्या ई-चलानमुळे एक अनोखी प्रेम कहाणी जुळून आली आहे. ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अहमदाबादच्या एका तरुणाच्या घरी ई-चलान पाठवलं. तेव्हा त्याच्या कुटुंबियांना तो एका मुलीवर प्रेम करत असल्याचं कळालं. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने या प्रेमीयुगुलाचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर या तरुणाने चलान पाठवण्यासाठी अहमदाबाद पोलिसांचे आभार मानले.

काय आहे प्रकरण?

अहमदाबाद पोलिसांनी शनिवारी एका तरुणाच्या घरी ई-चलान पाठवलं. यामध्ये त्या तरुणावर ट्रॅफिक नियम तोडल्याप्रकरणी 100 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ई-चलानमध्ये लावण्यात आलेल्या फोटोमध्ये तरुणाच्या गाडीवर एक तरुणी बसलेली दिसून आली. त्यानंतर घरच्यांनी त्याला या तरुणीबद्दल विचारणा केली. तेव्हा तरुणाने सांगितलं की, तो त्या मुलीवर प्रेम करतो. यानंतर तरुणाच्या आई-वडिलांनी त्या मुलीच्या कुटुंबाला घरी बोलावलं आणि दोन्ही कुटुंबाच्या संमतीने या प्रेमी युगुलाचं लग्न ठरलं.

ट्वीटरवर मानले पोलिसांचे आभार

या घटनेनंतर तरुणाने ट्विटरवर अहमदाबाद पोलिसांना टॅग करत पोलिसांचे आभार मानले. “मला पोस्टाद्वारे पोलिसांचं ई-चलान मिळालं आणि त्यासोबतच एक गमतीशीर किस्साही घडला. या ई-चलानमध्ये लागलेल्या फोटोमध्ये मी आणि माझी प्रेयसी दिसत होतो. पहिले माझ्या घरच्यांना तिच्याबद्दल माहित नव्हते. पण, या ई-चलाननंतर आता त्यांना आमच्याबद्दल माहित आहे”, असं ट्वीट त्या तरुणाने केलं.

अहमदाबादच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांचं रिट्वीट

तरुणाच्या या ट्वीटला अहमदाबादचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विपुल अग्रवाल यांनी रिट्वीट केलं. त्यासोबत अग्रवाल यांनी “जोर का झटका धीरे से” अशी टॅगलाईनही दिली.

या तरुणाचे अनेक काळापासून त्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, घरच्यांच्या भितीमुळे तो घरी सांगायला घाबरत होता, अशी माहिती तरुणाच्या मित्रांनी दिली.