महिलांना लग्नासाठी किमान वयोमर्यादा 21 वर्षे करण्याची मागणी

| Updated on: Aug 20, 2019 | 8:25 AM

स्त्री आणि पुरुष यांना लग्नासाठी वेगवेगळी वयाची अट ठेवणं हा स्पष्ट भेदभाव असल्याचं सांगत भाजप नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे

महिलांना लग्नासाठी किमान वयोमर्यादा 21 वर्षे करण्याची मागणी
Follow us on

नवी दिल्ली : महिलांना लग्न करण्यासाठी असलेली किमान वयाची अट पुरुषांप्रमाणेच करावी (Same Legal Marriage Age), अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही 21 वर्षे ही लग्नासाठी किमान वयोमर्यादा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याचिकेला 30 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डीएन पटेल आणि जस्टीस सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला दिले आहेत. सध्या भारतात महिलांना वयाच्या अठराव्या वर्षी बोहल्यावर चढण्याची परवानगी आहे, तर पुरुषांना लग्नासाठी वयाची एकविशी गाठेपर्यंत थांबावं लागतं.

स्त्री आणि पुरुष यांना लग्नासाठी वेगवेगळी वयाची अट ठेवणं हा स्पष्ट भेदभाव असल्याचं भाजप नेते आणि याचिकाकर्ते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी म्हटलं आहे. लग्नाच्या किमान वयातील फरक हा पुरुषप्रधान पूर्वग्रहांवर आधारित होता आणि त्याला वैज्ञानिक आधार नाही, असा दावाही उपाध्याय यांनी केला आहे.

या अटीमुळे लैंगिक समानता, लिंगाधारित न्याय आणि महिलांचा सन्मान या तत्त्वांचं उल्लंघन होत असल्याचंही उपाध्याय यांनी याचिकेत म्हटलं आहे. स्त्री-पुरुषांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा ठेवून महिलांसोबत केल्या जाणाऱ्या भेदभावाच्या लज्जास्पद पद्धतीला याचिकेतून आव्हान देत आहे, असंही याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.

महिलांनी विवाहसंस्थेत गौण भूमिका साकारण्याची अपेक्षा असल्यामुळे असंतुलन आढळतं. तरुण जोडीदाराने वयाने मोठ्या जोडीदाराचा आदर करणे आणि त्याची सेवा करण्याची अपेक्षा केली आहे. त्यामुळे वैवाहिक संबंधांत लिंग-आधारित उतरंड दिसते, असंही उपाध्याय यांचं म्हणणं आहे.