घरात न थांबणारे हॉस्पिटलमध्ये, नियम मोडणारे तुरुंगात दिसतील : उपमुख्यमंत्री

| Updated on: Apr 02, 2020 | 3:33 PM

'कोरोना' संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, त्याची सुरुवात काल झाली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. (Ajit Pawar warns Lockdown rule breakers)

घरात न थांबणारे हॉस्पिटलमध्ये, नियम मोडणारे तुरुंगात दिसतील : उपमुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाईन’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ हे दोनच पर्याय आज उपलब्ध आहेत. ‘कोरोना’ संसर्गाने ‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेने ‘होम क्वारंटाईन’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. (Ajit Pawar warns Lockdown rule breakers)

‘कोरोना’बाबत काही जणांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. भाजी बाजारातल्या गर्दीमुळे ‘कोरोना’ तुमच्या घरात पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. ‘कोरोना’ संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, त्याची सुरुवात काल झाली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरु केले आहेत. परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असेही अजित पवारांनी सांगितले.

हेही वाचा : श्रीमंत गेले फार्महाऊसवर, पण गरिबांच्या घरात बसायला जागा नाही, त्यामुळे ते रस्त्यावर : आव्हाड

राज्यात अन्नधान्याचा, खाद्यतेलाचा, दूध, भाजीपाल्याचा, औषधांचा, इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये. दिल्लीतील ‘मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करु नये, त्याला परवानगी दिली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आज राज्यात रामनवमी भक्तीभावाने, साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यापुढेही सर्व सण, उत्सव साधेपणानं साजरे व्हावेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. (Ajit Pawar warns Lockdown rule breakers)