वर्धा कारागृहात 150 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भीषण पाणी टंचाई

| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

वर्धा : नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या वर्धा जिल्हा सुरक्षित मानला गेला आहे. मात्र, यावर्षी जिल्ह्याला मागील 4 दशकात न पडलेल्या भीषण दुष्काळाने ग्रासले आहे. यातून जिल्हा कारागृह देखील सुटलेले नाही. वर्धा कारागृहात 150 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पाणीटंचाईच्या तीव्र झळा आता कैद्यांनाही सोसाव्या लागत आहे. वर्धा कारागृहातील 6 विहिरी असून या सर्व कोरड्या पडल्या आहेत. सध्या कारागृहासाठी 3 […]

वर्धा कारागृहात 150 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भीषण पाणी टंचाई
Follow us on

वर्धा : नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या वर्धा जिल्हा सुरक्षित मानला गेला आहे. मात्र, यावर्षी जिल्ह्याला मागील 4 दशकात न पडलेल्या भीषण दुष्काळाने ग्रासले आहे. यातून जिल्हा कारागृह देखील सुटलेले नाही. वर्धा कारागृहात 150 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पाणीटंचाईच्या तीव्र झळा आता कैद्यांनाही सोसाव्या लागत आहे.

वर्धा कारागृहातील 6 विहिरी असून या सर्व कोरड्या पडल्या आहेत. सध्या कारागृहासाठी 3 टँकरची गरज आहे. मात्र 2 टँकरवरच भागवावे लागत आहे. पाणीटंचाईने कारागृह शेतातील पिकेही पूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे टंचाईच्या काळात पाणी पुरवठा करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.

पाण्याच्या टंचाईने कैद्यांमध्ये असंतोष

वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात जवळपास 350 कैदी आहेत. कारागृहात एकूण 6 विहिरी आहेत. त्यापैकी 3 विहिरी कैद्यांना पाणी पुरवठ्यासाठी आहेत. पण, या विहिरींनी तळ गाठल्याने कारागृहात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. पालिकेकडून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तो गरजेपेक्षा कमी आहे. पाण्याअभावी बाथरुमची सफाई करणेही शक्य होत नाही. त्यामुळे कारागृहात दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच कैद्यांच्या प्रकृतीविषयी अडचणी तयार होत आहेत. कारागृह प्रशासनाने पाणी पुरवठा व्हावा आणि विहिरीतील गाळ काढावा यासाठी प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला आहे. मात्र, अद्यापही गाळ काढण्यात आलेला नाही. पाण्याच्या टंचाईने कैद्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

150 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एवढी भीषण पाणी टंचाई

वर्धा कारागृहाची स्थापना 1868 रोजी झाली. तेव्हापासून पहिल्यांदाच एवढी तीव्र पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. कारागृहात कैद्यांसाठी असलेल्या 3 विहिरी आणि शेतीसाठी असलेल्या 3 विहिरींचे पाणी अटले आहे. या कारागृहात आधीच क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. यावर्षी 15 खुले कैदीही आहेत. त्यांनाही सध्या पाणी टंचाईमुळे काम देता येत नाही.

दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न देणारी शेती उद्ध्वस्त

कारागृहाची 7 एकर शेती आहे. 2017-18 मध्ये या शेतात भरगोस उत्पन्न आले होते. त्यामुळे विदर्भात या कारागृहाचा उत्पन्नात दुसरा क्रमांक होता. आता हीच शेती दुष्काळाने मातीमोल झाली आहे. खुल्या कैद्यांनाही रोजगार उपलब्ध करुन देणारी ही शेती यावर्षी तोट्यात गेली आहे. रोजच्या जेवणात उपयोगात येणारा भाजीपाला आता गुरांना चारा म्हणून टाकण्याची वेळ कारागृहावर आली आहे. या शेतीत वांगे, चवळी, ढेमस आणि गोबी या भाज्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, पाणी टंचाईने सर्व उद्ध्वस्त केले. आता शेतातील विहिरी केवळ जनावरांच्या चाऱ्यांना पाणी पुरवत आहेत. शेतातील तळ गाठलेल्या तीन विहिरी सध्या 2 बैलांची तहान भागवतात.

4 महिने उलटूनही कारागृहातील पाणी टंचाईवर उपाय नाही

यावर्षी पाणी टंचाईची झळ कारागृहाला बसणार असल्याचा संशय कारागृह अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे कारागृहाकडून 23 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत कारागृहातील विहिरींचा गाळ साफ करण्याची विनंती करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी 26 मार्चला हे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवत कारवाईचे आदेश दिले. मात्र, 4 महिने उलटूनही कारागृहातील कामाचे आदेश बांधकाम विभागात धुळखात आहेत.