औरंगाबादमध्ये विमानाचे ‘इमर्जन्सी लँडिंग’; 165 प्रवासी सुखरुप

| Updated on: Jun 03, 2019 | 8:34 AM

औरंगाबाद : गो एअरच्या पाटणा-मुंबई विमानाचे रविवारी सायंकाळी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग झाले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या दोन्ही इंजिनची गती मंदावली होती. तसेच विमानातील एसीही बंद पडल्याने प्रवाशांचा श्वासही गुदमरत होता. यावेळी वैमानिकाने प्रसंगावधान राखत इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला. विमानात 165 प्रवासी प्रवास करत होते. ते सर्व सुखरुप आहेत. विमानाने पाटणाहून उड्डाण केल्यानंतर अर्ध्या वाटेवर […]

औरंगाबादमध्ये विमानाचे ‘इमर्जन्सी लँडिंग’; 165 प्रवासी सुखरुप
Follow us on

औरंगाबाद : गो एअरच्या पाटणा-मुंबई विमानाचे रविवारी सायंकाळी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग झाले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या दोन्ही इंजिनची गती मंदावली होती. तसेच विमानातील एसीही बंद पडल्याने प्रवाशांचा श्वासही गुदमरत होता. यावेळी वैमानिकाने प्रसंगावधान राखत इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला. विमानात 165 प्रवासी प्रवास करत होते. ते सर्व सुखरुप आहेत.

विमानाने पाटणाहून उड्डाण केल्यानंतर अर्ध्या वाटेवर दोन्ही इंजिनची गती कमी-अधिक होत असल्याचे निदर्शनास आले. विमानात काहीसा कंपही होत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत होता. त्यातच विमानातील एसीही बंद पडला. त्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ लागला. अखेर वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला आणि चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाला इमर्जन्सी लॅँडिंगची माहिती दिली. त्यानुसार प्राधिकरणाने रुग्णवाहिका, डॉक्टर, अग्निशमन विभागाला सतर्क केले. अवघ्या काही मिनिटांमध्येच रुग्णवाहिकांचा ताफा विमानतळावर दाखल झाला. वैमानिकाने सुरक्षितपणे विमान धावपट्टीवर उतरवले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

चिकलठाणा विमानतळाच्या प्रशासनाची प्रतिक्रिया

विमानाच्या दोन्ही इंजिनची गती मंदावली होती. त्यामुळे लँडिंगसाठी आपत्कालीन परिस्थितीची प्रक्रिया पूर्ण करुन सुरक्षित लँडिंग झाले, अशी माहिती चिकलठाणा विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.