ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’

| Updated on: Jan 25, 2020 | 3:43 PM

ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था, तू सप्तसूर माझे, सुरमयी अखियों मे, ऐ जिंदगी गले लगा ले, सपने में मिलती है यासारखी अनेक गाजलेली गाणी सुरेश वाडकरांच्या आवाजात स्वरबद्ध झाली आहेत

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री
Follow us on

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ जाहीर (Suresh Wadkar conferred with Padmashree) झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.

सुरेश वाडकरांनी हिंदी आणि मराठीसह भोजपुरी आणि कोकणी भाषेतही हजारो गाणी गायली आहेत. ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था, तू सप्तसूर माझे, सुरमयी अखियों मे, ऐ जिंदगी गले लगा ले, सपने में मिलती है, चप्पा चप्पा चरखा चले यासारखी अनेक गाजलेली गाणी वाडकरांच्या आवाजात स्वरबद्ध झाली आहेत. ‘पद्मश्री’च्या रुपाने सुरेश वाडकरांच्या स्वरमयी कारकीर्दीला कोंदण लाभलं आहे.

सुरेश वाडेकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 रोजी कोल्हापुरात झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी गुरु पंडित जियालाल वसंत यांच्याकडून संगीताचं शिक्षण सुरु केलं. सुरेश वाडेकर यांचा विवाह 1988 मध्ये पद्मा यांच्याशी झाला. पद्मा वाडकरही प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत.

‘गमन’ या चित्रपटात सुरेश वाडकरांना ‘सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है’ हे गाणं गाण्याची संधी मिळाली. या गाण्यामुळे सुरेश वाडकर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. त्यानंतर 1981 मध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी ‘क्रोधी’ चित्रपटात ‘चल चमेली बाग में’, तर ‘प्यासा सावन’ चित्रपटात लता मंगेशकर यांच्यासह ‘मेघा रे मेघा रे’ ही गाणी गाऊन घेतली.

2007 मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरेश वाडकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव केला होता. 2011 मध्ये सुरेश वाडकरांना ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मध्य प्रदेश सरकारने त्यांना प्रतिष्ठित ‘लता मंगेशकर पुरस्कारा’नेही गौरवलं आहे.

Suresh Wadkar conferred with Padmashree