सॅना मरिन जगातील सर्वात तरुण पंतप्रधान, वय अवघं…

| Updated on: Dec 10, 2019 | 8:35 AM

शपथविधीनंतर मरिन या फक्त फिनलंडच्याच नाही, तर जगातील सर्वात तरुण पंतप्रधान असतील. त्या फिनलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरणार आहेत.

सॅना मरिन जगातील सर्वात तरुण पंतप्रधान, वय अवघं...
Follow us on

हेलसिंकी (फिनलंड) : 34 वर्षीय सॅना मरिन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा बहुमान पटकवणार आहेत. मरिन येत्या आठवड्यात फिनलंड या उत्तर युरोपियन देशाच्या पंतप्रधानपदाची (Finland Prime Minister Sanna Marin) शपथग्रहण करतील.

फिनलंडमध्ये पाच घटकपक्षांनी युती करत सत्ता स्थापन केली आहे. विशेष म्हणजे पाचपैकी चार पक्षांची धुरा महिलांच्या खांद्यावर आहे. या चौघीही 34 वर्षांखालील आहेत.

युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होनारुक हे 35 वर्षांचे, तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न या 39 वर्षांच्या आहेत. आतापर्यंत होनारुक हे सर्वात तरुण पंतप्रधान, तर आर्डर्न या सर्वात तरुण महिला पंतप्रधान होत्या. दोघंही पदावर असतानाच, दोघांचाही विक्रम मोडत मरिन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान (साहजिकच सर्वात तरुण महिला पंतप्रधानही) ठरल्या आहेत.

सर्व सरकारी पक्षांचा विश्वास निर्माण करण्यासाठी आता शब्दांपलिकडे जात कृती करणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया मरिन यांनी दिली. स्थानिक वेळेनुसार रविवारी रात्री त्यांची पंतप्रधानपदासाठी निवड करण्यात आली.

टपाल कामगारांच्या संपामुळे फिनलंडमध्ये वादळ निर्माण झालं होतं. संप हाताळताना झालेल्या चुकांमुळे विद्यमान पंतप्रधान अँटी रिन्ने यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ‘सोशल डेमोक्रॅटिक पक्षा’तील खासदारांनी पक्षश्रेष्ठी सॅना मरिन यांची निवड केली.

शपथविधीनंतर मरिन या फक्त फिनलंडच्याच नाही, तर जगातील सर्वात तरुण पंतप्रधान असतील. त्या फिनलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरणार आहेत.

मरिन यांच्याकडे आतापर्यंत वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी होती. 2012 मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. 2015 मध्ये सॅना मरिन खासदारपदी निवडून आल्या. अॅना रिन्ने यांच्या अनुपस्थितीत मरिन यांनी निवडणुकांमध्ये पक्षाला चमकदार कामगिरी (Finland Prime Minister Sanna Marin) करण्यास मदत केली.

‘महिलांच्या नेतृत्त्वात सरकार असल्याने फिनलंड हा एक आधुनिक आणि प्रगतीशील देश असल्याचे सिद्ध होते’, असं फिनलंडचे माजी पंतप्रधान अॅलेक्झँडर स्टब यांनी ट्वीट केलं आहे.