वर्ध्यात 48 तासात पाच हत्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

वर्धा : गेल्या अठ्ठेचाळीस तासात वर्धा जिल्ह्यात वेगवेगळ्या भगात पाच हत्या झाल्या आहेत. या घटनांमुळे वर्ध्यात गुन्हेगारी वाढली असल्याचं समोर येत आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या हत्यांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. यातच वर्ध्याच्या वंजारी चौकात पेट्रोल पंपावर झालेल्या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. तरीही पोलीस अद्याप गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकलेली नाही. पहिली घटना […]

वर्ध्यात 48 तासात पाच हत्या
Follow us on

वर्धा : गेल्या अठ्ठेचाळीस तासात वर्धा जिल्ह्यात वेगवेगळ्या भगात पाच हत्या झाल्या आहेत. या घटनांमुळे वर्ध्यात गुन्हेगारी वाढली असल्याचं समोर येत आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या हत्यांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. यातच वर्ध्याच्या वंजारी चौकात पेट्रोल पंपावर झालेल्या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. तरीही पोलीस अद्याप गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकलेली नाही.

पहिली घटना –

समुद्रपूर येथे नागपूर-चंद्रपूर मार्गावर परडा फाट्यावर गुरुवारी पहाटे एका व्यक्तीची गळा आवळून हत्या करण्यात आली. आरंभा येथील सुखराम उर्फ गोविंद शालीक गोळघाटे या व्यक्तीची हत्या करण्यात आली. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं. या हत्येचा छडा लागण्याआधीच वर्धा येथील वंजारी चौकात पुन्हा एक हत्या झाली. ही घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

दुसरी घटना –

जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. रात्री 11 च्या सुमारास उमेश ठाकरे हे पेट्रोल पंपाशेजारी उभे होते. तेव्हा पप्पू दाबट यांच्या गटाने उमेश ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. आधी त्यांना लाताबूक्क्यांनी मारहाण केली, त्यानंतर धारदार शस्त्राने वार करुन उमेश यांची हत्या केली. या हल्ल्यात उमेश ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पप्पू दाबट आणि उमेश ठाकरे यांच्यातील पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे बोललं जात आहे. वर्धा पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

तिसरी घटना –

दहेगाव मिस्किन जवळच्या चाणकी कोपरा येथे कुटुंबातील महिलेशी वाद करणे जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. कोपरा येथील संजय माणिक वानखेडे याचा क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी वाद झाला. या वादात महेंद्र बबन वानखेडे आणि इतर चार जणांनी संजय माणिक वानखेडे यांच्यावर काठीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने संजय यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

चौथी घटना –

हिंगणघाट येथे शेतीवर असणाऱ्या सालदाराने मालकाची हत्या केल्याची घटना समोर आली. पैसे दिले नाहीत म्हणून वाद घालून तालुक्यातील डाग (बोरगाव) येथे शंकर रिठे या शेतकऱ्यावर सालगडी दशरथ टेकाम याने काठीने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झाल्याने शंकर यांचा मृत्यू झाला.

पाचवी घटना –

पाचव्या घटनेत पिंपरी मेघे येथे कुख्यात गुंडाला सात जणांनी लाठ्या काठ्यांनी बदडले. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रशांत उर्फ दड्या काशीद याचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेतील सात आरोपींना राम नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे .

वर्धा जिल्ह्यात घडलेल्या या पाच खुनाच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे वर्ध्याच्या पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.