गणपतीपुळे मंदिरही आजपासून भाविकांसाठी खुलं, ग्रामस्थ आणि भाविकांचा थेट संपर्क टाळण्यासाठी नियमावली

| Updated on: Nov 16, 2020 | 12:35 PM

गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येताना दुर्वा, फुले, आदी ओलं साहित्य न आणता नारळ, सुका मेवा असा प्रसाद बंद पिशवीमध्ये पॅक करुन आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मंदिरात कुठल्याची प्रकारची पूजा, अभिषेक करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.

गणपतीपुळे मंदिरही आजपासून भाविकांसाठी खुलं, ग्रामस्थ आणि भाविकांचा थेट संपर्क टाळण्यासाठी नियमावली
Follow us on

रत्नागिरी: महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी पसंतीचं ठिकाण असलेलं सुप्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरही आजपासून सुरु झालं आहे. सरकारने घालून दिलेल्या अटीशर्थींप्रमाणे भाविकांसाठी गणपतीचं दर्शन सुरु करण्यात आलं आहे. आज पहाटे 5 वाजता गणपतीपुळ्यातील मंदिर उघडण्यात आलं. भाविकांना आजपासून पहाटे 5.30 वाजेपासून ते संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत गणपतीचं दर्शन घेता येणार आहे. (Ganpatipule temple for devotees starting from today, rules apply)

ग्रामस्थ आणि राज्यभरातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा थेट संपर्क होऊ नये, यासाठी मंदिर समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यात पहाटे 5.30 ते सकाळी 7.30 पर्यंत स्थानिकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत बाहेर गावावरुन आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मंदिर परिसर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यावेळेत मंदिर परिसरात निर्जंतुकीकरणाचं काम होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता मंदिर सुरु करुन संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मंदिर सुरु राहणार आहे.

गणपतीच्या दर्शनासाठी येताना दुर्वा, फुले, आदी ओलं साहित्य न आणता नारळ, सुका मेवा असा प्रसाद बंद पिशवीमध्ये पॅक करुन आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मंदिरात कुठल्याची प्रकारची पूजा, अभिषेक करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच मंदिरात प्रवेश करताना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. दोन भाविकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून रांगा लावल्या जाणार आहेत. 10 वर्षाखालील मुले आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दीर्घकालीन आजारी व्यक्ती यांनी मंदिरात येऊ नये असं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आलं आहे.

स्वामी समर्थांच्या दर्शनाने भाविकांना आनंदाश्रू!

अक्कलकोट इथलं स्वामी समर्थांचं मंदिरंही आजपासून भाविकांसाठी खुलं झालं आहे. स्वामींचे राज्यभरात लाखो भक्त आहेत. आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर स्वामींचे भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी दाखल झाले आहेत. जवळपास 8 महिन्यांनंतर झालेल्या दर्शनामुळं भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं चित्र इथं पाहायला मिळालं.

विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. पंढरपूरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 65 वर्षावरील आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी घालण्यात आली आहे. नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर लोकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवास देण्यात येईल असा निर्णय मंदिर प्रशानसनाकडून घेण्यात आला आहे.

शिर्डीतील साई मंदिरात 6 हजार भाविकांना दर्शनाची सोय

शिर्डीतील साईमंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन ठेवलेले आहे, त्यांनीच शिर्डीत यावे असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

मास्क, सोशल डिस्टन्सिंग गरजेचे; हार, फुले, ओटी आणण्यास मनाई, कोणत्या मंदिरांचे नियम काय?

दिवाळी पाडव्यानिमित्त तुळजाभवानीची शिवकालीन अलंकार पूजा, दर्शनासाठी राज्यभरातून भाविक तुळजापुरात

Ganpatipule temple for devotees starting from today, rules apply