टॅक्सी चालकाचे अभिनेत्रीसोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ

| Updated on: Jul 11, 2019 | 1:15 PM

प्रवासादरम्यान महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोलकात्यात कॅब चालकाने अभिनेत्री स्वस्तिका दत्ता हिच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

टॅक्सी चालकाचे अभिनेत्रीसोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ
Follow us on

कोलकाता: प्रवासादरम्यान महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोलकात्यात कॅब चालकाने अभिनेत्री स्वस्तिका दत्ता हिच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याआधीही कोलकात्यात असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे एकूणच महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अभिनेत्री स्वस्तिका बुधवारी (10 जुलै) मालिकेच्या शुटिंगसाठी कॅबने सेटवर जात होती. प्रवासादरम्यानच चालकाने स्वस्तिकासोबत गैरवर्तन केले आणि शिवीगाळही केली. त्यानंतर सीएन रॉय रोडवर 42 क्रमांक बस स्टँडच्याजवळ राईड रद्द करुन तिला जबरदस्तीने गाडीबाहेर काढले. यानंतर अभिनेत्री स्वस्तिकाने या घटनेबाबत फेसबुकवर लिहिले. पोलिसांनी स्वस्तिकाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच कॅब चालक जमशेद हुसेन याला अटकही केली.


स्वस्तिकाने म्हटले आहे, “सकाळी 8:15 वाजता मी उबर कॅब बुक केली होती. त्यानंतर कॅब चालक जमशेदने माझ्या घरुन मला पिकअप केले. काही अंतर प्रवास केल्यानंतर त्याने अचानक गाडीची बुकिंग रद्द केली आणि मला गाडीखाली उतरण्यास सांगितले. मी नकार दिल्यानंतर त्याने गाडी मागे वळवून तो राहतो त्या परिसरात नेली. तेथे त्याने माझ्याशी गैरवर्तन करत शिवीगाळ केली.”

स्वस्तिकाने फेसबुकवर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “माझ्यासोबत असा प्रसंग याआधी कधीही झालेला नाही. आज हे माझ्यासोबत घडले आहे. मला अक्षरशः गाडीबाहेर फेकण्यात आले. मी आरडाओरडा केला, मात्र, त्याने निर्जनस्थळी गाडी नेली. तेथे त्याने धमकी देत माझ्याशी गैरवर्तन केले. तसेच काय करायचे आहे ते कर, असेही म्हटले. त्यावेळी मला कामावर जाणे आवश्यक होते, त्यामुळे मी कशीबशी कामावर केले. मात्र, त्यानंतर मी वडिलांशी बोलून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.”

यानंतर स्वस्तिकाने आपल्या कुटुंबीयांच्या सल्ल्यानुसार संबंधित चालकाविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेबाबत बोलताना उबरचे प्रवक्ते म्हणाले, “हे आमच्या सुरक्षेसंबंधित निकषांचे उल्लंघन आहे. कंपनीने या चालकाचा परवाना रद्द केला आहे.”